सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील प्रशासनाने नोटीस पाठवलेल्या बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार !

भाजपचे माजी खासदार नीलेश राणे

मालवण : मालवण किनारपट्टीवरील दांडी, गवंडीवाडा, बाजारपेठ येथील काही बांधकामे अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया महसूल प्रशासनाने चालू केली होती. याविषयी माहिती मिळाल्यानंतर भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रशासन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित बांधकामांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाबा परब यांनी दिली.

मालवण किनारपट्टी भागातील काही अवैध बांधकामांना प्रशासनाने नोटीस पाठवली होती. त्यामुळे अनेक वर्षे असलेल्या बांधकामांवर कारवाई होण्याच्या भीतीने स्थानिकांनी माजी खासदार राणे, तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. ‘आम्ही अनेक जण अनेक वर्षे या ठिकाणी रहात आहोत. याविषयीची कागदपत्रेही आमच्याकडे आहेत. प्रशासन आम्हाला अनधिकृत ठरवत असेल, तर त्या भूमीचे सर्वेक्षण करून प्रशासनाने खात्री करावी. आम्ही अनधिकृत भूमीत रहात नाही हे सिद्ध होईल’, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी प्रशासनालाही निवेदने देण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता त्या बांधकामांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बाबा परब यांनी सांगितले.