गोवा : ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना
फोंडा : रविवार, ५ नोव्हेंबर या दिवशी कपिलेश्वर पंचायतनातील एक देवता असलेली ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची ५ नोव्हेंबरला प्रतिष्ठापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देवीचे यज्ञवेदींवरून मंदिरात आगमन झाल्यानंतर मधुपर्क पूजा आणि सकाळी ८.२२ च्या शुभमुहूर्तावर श्री देवी भगवतीची मंत्रघोषात प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर महापूजा आणि अन्य धार्मिक विधी, तसेच दुपारी पूर्णाहुती, महाआरत्या आणि महाप्रसाद झाले. सायंकाळी ७ वाजता श्री भगवतीदेवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आणि सायंकाळी ७.३० वाजता श्री सरस्वती मंडळ, दाग, फोंडा प्रस्तुत ‘रथोत्सव’ हा कोकणी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. परिसरातील सहस्रो भक्तगणांनी नूतन मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. काही जणांनी देवीची ओटी भरली.
(सौजन्य : Goa 365 TV)
श्री भगवतीदेवीचा ‘नूतन वास्तू आणि नूतन मूर्ती प्रतिष्ठापना’ सोहळा २ नोव्हेंबरला प्रारंभ झाला होता. २ नोव्हेंबरला श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीचे मिरवणुकीसह आगमन आणि धार्मिक विधी झाले. ३ नोव्हेंबरला कुमठा, कर्नाटक येथील श्री लक्ष्मीनरसिंह पिठाधीश श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामीजी यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना आणि स्वामींचे आशीवर्चन झाले. ४ नोव्हेंबरला धार्मिक विधींसह सायंकाळी गीत गायनाचा कार्यक्रम झाला.
सभापती रमेश तवडकर यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट
ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन वास्तू आणि नूतन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षाला गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी ४ नोव्हेंबरला भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका सौ. रंजना वैद्य यांनी त्यांना श्री भगवतीदेवीविषयी माहिती असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक, आरती संग्रह आणि लघुग्रंथ भेट दिला.