दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महिलेवर कात्रीने आक्रमण करणारा चोर अटकेत !; मुंबईत श्वसनाच्या रुग्णांत वाढ… ५ वर्षांपासून पसार असणारा दरोडेखोर अटकेत… ललित पाटील याने सराफाकडे ठेवलेले सोने शासनाधीन… महागड्या मद्याची स्वस्तात विक्री…
महिलेवर कात्रीने आक्रमण करणारा चोर अटकेत !
अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
डोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकात उतरून रुळांवरून चालत जाणार्या महिलेवर लाल बहादूर यादव (वय २४ वर्षे) या चोराने कात्रीने आक्रमण केले आणि लूटमार केली. तिच्याकडील भ्रमणभाष, मंगळसूत्र, कानातले दागिने चोरून त्याने पळ काढला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी चोराला मुद्देमालासह अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईत श्वसनाच्या रुग्णांत वाढ !
मुंबई – शहरातील हवा विषारी होत असल्याने श्वसन आणि दमा यांचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. रुग्णाला ताप किंवा संसर्ग नसल्यास, हवेतील धूळ आणि कण यांमुळे ॲलर्जी, दमा, तसेच आणि इतर फुप्फुसांशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये खोकला आणि श्वासोच्छ्वास यांचा त्रास वाढू लागला आहे. आधुनिक वैद्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
५ वर्षांपासून पसार असणारा दरोडेखोर अटकेत !
दराडेखोरांना ५ वर्षे अटक करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ?
जळगाव – प्रथमेश उपाख्य डॉन प्रकाश ठमके याला पोलिसांनी अटक केली असून तो ५ वर्षांपासून पोलिसांना चुकवत होता. एका कार्यक्रमात पोलिसांनी त्याला पकडले. त्याने साथीदारांच्या साहाय्याने ठाणे आणि पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता.
ललित पाटील याने सराफाकडे ठेवलेले सोने शासनाधीन !
पुणे – अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील याने नाशिक येथील सराफाकडे ठेवलेले ३ कोटी रुपये किमतीचे ५ किलो सोने पोलिसांनी शासनाधीन केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये ही कारवाई केली. यापूर्वी पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटील यांच्या घरातून १ कोटी ८० लाख रुपये किमतीचे ३ किलो सोने शासनाधीन केले होते.
महागड्या मद्याची स्वस्तात विक्री !
नागपूर – देहली आणि हरियाणा येथून महागडे मद्य स्वस्तात आणून त्याची अवैधरित्या विक्री होत होती. माल वितरीत करणार्या रिक्शाचालकाला अटक करत ४१ लाख ६४ सहस्र रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. अशोक चेलानी असे मालकाचे नाव असून अतुल भालाधरे असे रिक्शाचालकाचे नाव आहे. (मद्यावर बंदी आणण्यासाठीच प्रयत्न व्हावेत ! – संपादक)