डागडुजीनंतर काही दिवसांतच ग्रह, तारे या संदर्भातील माहिती देणार्या चिंचवड येथील तारांगणला गळती !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरातील विद्यार्थ्यांना अवकाश, खगोल, ग्रह आणि तारे या संदर्भातील माहिती मिळावी; म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन १५ मे २०२३ या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले; परंतु त्यानंतर काही दिवसांत पावसाचे पाणी तारांगणाच्या डोममधून गळू लागले आहे. त्यामुळे अनेक दिवस तारांगण बंद करून त्याला टाळे लावण्यात आले आहेत. डोमच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांचा व्यय करण्यात येणार आहे.
सल्लागार आणि आर्किटेक्ट पी.के. दास यांच्या मार्गदर्शनाखाली हे तारांगण उभारण्यात आले आहे. हे तारांगण पहाण्यासाठी शहरातील विद्यार्थी, तसेच नागरिक यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता; मात्र पावसाळ्यात तारांगणच्या डोममधून पावसाचे पाणी गळू लागल्यामुळे तारांगणमधील शो (कार्यक्रम) बंद करण्यात आले. डोमची दुरुस्ती करणार्या एजन्सीची संख्या अल्प आहे. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय अ क्षेत्रीय स्थापत्य विभागाने घेतला आहे. २० लाख रुपयांचा निधी तारांगण दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
संपादकीय भूमिकालाखो रुपये खर्च करून तारांगणला गळती लागत असेल, तर यातून महापालिकेच्या कार्याची फलनिष्पत्ती लक्षात येते ! संबंधितांना कठोर शिक्षा करावी ! |