‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.
एखाद्या साधकाने चूक सांगितल्यावर वाईट वाटत असेल, तर ‘अ २’ पद्धतीने स्वयंसूचना द्यावी !
साधिका : जेव्हा माझ्याकडून सेवेत होणार्या चुका माझ्या लक्षात येतात, तेव्हा मला त्याचे काही वाटत नाही; परंतु एखाद्या साधकाने माझी चूक सांगितली, तर ‘माझ्याकडून सेवेत चूक झाली आणि त्या साधकाला मला सांगावे लागले’, याचे मला वाईट वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘साधकाने सांगितल्यावर वाईट वाटले’, ही प्रतिक्रिया झाली. त्या वेळी ‘बरेे झाले, त्यांनी मला सांगितले. मी ही चूक सुधारीन’, अशी प्रतिक्रिया असायला पाहिजे. ही सूचना स्वभावदोष सारणीत लिहिल्यावर तिच्यापुढे ‘अ २’, असे लिहीणे. तू असे स्वभावदोष सारणीत लिहीत नाहीस का ? ‘कोणती स्वयंसूचना द्यायची ?’, हे कुणाला विचारत नाहीस का ?
साधिका: कधी कधी विचारते. कधी कधी नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे नको. ज्या दिवशी मनात विचार येईल, त्याच दिवशी विचारून घे. त्याच दिवसापासून स्वयंसूचना चालू केली, तर मनातील विचार लवकर नष्ट होतील. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचनांच्या ‘अ १’, ‘अ २’, ‘आ १ (ब १)’, ‘आ २ (ब २)’, ‘अ ३’, ‘इ १’ आणि ‘इ २’ (टीप १) या पद्धती आहेत. त्या पद्धतींप्रमाणे सूचना दिल्यास जगातील कोणतीही अडचण अशी नाही की, जिच्यात सुधारणा होऊ शकत नाही. समजले का? हे लक्षात ठेव ! हे दुसर्यांनाही सांग !
टीप १
स्वयंसूचना पद्धत ‘अ १’ : अयोग्य कृती, विचार आणि भावना यांची जाणीव अन् त्यांवर नियंत्रण
स्वयंसूचना पद्धत ‘अ २’ : कुणाविषयी किंवा कशाविषयीही अयोग्य प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिक्रिया देणे
स्वयंसूचना पद्धत ‘अ ३’ : कठीण वाटणार्या प्रसंगाचा सराव करणे
स्वयंसूचना पद्धत ‘आ १ (ब १)’ : इतरांचे स्वभावदोष दूर करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या मनावरील ताण दूर करणे
स्वयंसूचना पद्धत ‘आ २ (ब २)’ : जेव्हा परिस्थिती पालटता येत नाही, तेव्हा तत्त्वज्ञाच्या भूमिकेत रहाणे किंवा त्याकडे साक्षीभावाने पहाणे
स्वयंसूचना पद्धत ‘इ १’ : सतत नामजप करणे
स्वयंसूचना पद्धत ‘इ २’ : स्वतःला शिक्षा करणे
साधकांच्या अनुभूतींमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ग्रंथलिखाणात अधिक वैशिष्ट्यपूर्ण माहिती येण्यास साहाय्य होणे‘आज माझ्या लक्षात आले की, मी जे ग्रंथलिखाण पूर्वी करायचो, ते मी अभ्यास केलेल्या ग्रंथांतील ज्ञान, मला येणार्या अनुभूती आणि सुचलेले विचार यांच्या आधारे करायचो. आता माझ्या लक्षात आले की, साधकांना येणार्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींवरून मला अध्यात्माचे विविध विषय आणि विविध पैलू यांची माहिती होते. त्यामुळे मला अनेक विचार सुचतात आणि नवीन ग्रंथांचे लिखाण करतांना आणखी विविध विषय सुचतात. त्यामुळे नवीन ग्रंथांत पूर्वीच्या ग्रंथांपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण माहिती मला लिहिता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२१.७.२०२३) |