रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना कांद्यापासून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे
‘एके दिवशी मी रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात भाजीसाठी कांदा तळत होते. कांदा कापणे, तो तळणे, त्याची पेस्ट बनवणे इत्यादी कृृती करतांना गुरुदेवांनी मला साधनेच्या संदर्भात पुढील सूत्रे सुचवली.
१. कांदा कापणे
१ अ. स्वतंत्र असलेला कांदा कापल्यावर अनेकांत मिसळतोे, तसेच घरी स्वतंत्र असलेला साधक आश्रमात आल्यावर अनेक साधकांमध्ये मिसळणे : कांदा कापण्याआधी तो स्वतंत्र होता. त्याला कापल्यावर तो अनेकात मिसळला आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले. त्याप्रमाणे प्रत्येक साधक घरी स्वतंत्र असतो; परंतु आश्रमात आल्यावर तो अनेक साधकांमध्ये मिसळतो. त्याची आवड-नावड न्यून होते.
१ आ. कांदा कापतांना त्याला घाव सोसावे लागणे, तसे साधक घडतांना त्याला अनेक बंधनांतून जावे लागणे : कांदा कापतांना त्याला स्वतःच्या शरिरावर अनेक घाव सोसावे लागतात. त्याप्रमाणे साधकही इतरांमध्ये मिसळतांना दुसर्यांचा विचार करणे, कार्यपद्धती आणि वेळेचे पालन करणे इत्यादींमुळे मनाप्रमाणे न वागता देवाला अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न करू लागतो.
२. कांदा तळणे
२ अ. स्वतःमधील पाण्याचा अंश नाहीसा झालेल्या कांद्याप्रमाणे साधकालाही अहंचा त्याग करावा लागणे : पुढे कांद्याला तापलेल्या तेलात घातल्यावर तोे स्वतःला झोकून देऊन स्वतःतील पाण्याचा अंश नाहीसा करतो. साधक बनण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून ‘मी’ चा अंश न्यून होईपर्यंत प्रयत्न करायचे असतात. तेव्हाच तो ‘चांगला साधक’ बनतो.
३. कांद्याची वाटून ‘पेस्ट’ करणे
३ अ. स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करून ‘पेस्ट’ बनून कांद्याने भाजीशी एकरूप होणे, तसे साधकाने समष्टीशी एकरूप होणे : पुढे त्या तळलेल्या कांद्याला स्वतःच्या अस्तित्वाचाही त्याग करावा लागतो आणि त्याची ‘पेस्ट’ (पाणी न घालता कांदा वाटून बनवलेला लगदा) बनवली जाते. आपल्यालाही केवळ चांगला साधक बनून थांबता येत नाही, तर पुढे ‘चांगला शिष्य’ बनून गुरुमहिमा जगामध्ये पसरवण्यासाठी समष्टीशी एकरूप व्हावे लागते.
३ आ. कांद्याची ‘पेस्ट’ भाजीतील सर्व पदार्थांशी एकरूप झाल्यावर भाजी रुचकर बनते. साधक समष्टीशी एकरूप झाल्यावर जगात गुरुकार्य जोमाने पसरेल आणि लवकर ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होईल.
‘वरील सूत्रे सुचवून ती लिहून घेतल्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली जयवंत रसाळ, जयसिंगपूर, (जिल्हा) सांगली. (२७.९.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |