कांदळगाव (तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती नंदा बाळकृष्ण परब (वय ७१ वर्षे) यांच्या आजारपणात, तसेच त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
कांदळगाव (तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती नंदा बाळकृष्ण परब (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७१ वर्षे) यांचे २५.१०.२०२३ या दिवशी निधन झाले. ६.११.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला त्यांच्या आजारपणात, तसेच निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आईचा विवाह झाल्यावर तिने कुटुंबाला एकत्र आणणे आणि तिच्यातील प्रेमभावामुळे सर्व जण गुण्यागोविंदाने राहू लागणे
‘आई पूर्वीपासूनच धार्मिक होती. ती जन्मतः शाकाहारी होती. ती कुणाशीही कधी मोठ्याने बोलली नाही. आईचा विवाह होण्यापूर्वी घरातील लोक एकत्र रहात नव्हते. ते एकमेकांशी बोलतही नव्हते. आईचा विवाह झाल्यावर तिने पूर्ण कुटुंबाला एकत्र आणले. आईमध्ये पुष्कळ प्रेमभाव असल्याने नंतर सर्व जण गुण्यागोविंदाने एकत्र रहायला लागले आणि कुटुंबातील सर्व वादविवाद संपले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणे
वर्ष २०१९ मध्ये माझ्या बाबांचे निधन झाले. तेव्हापासून आईने गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेल्या प्रत्येक सूत्राचे आज्ञापालन केले. बाबा गेल्यावर गुरुदेवांनी मला निरोप पाठवला, ‘‘आईला सांग, ‘स्थिर रहा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कर.’’ मी आईला गुरुदेवांचा निरोप दिल्यावर ती लगेच स्थिर झाली आणि तिने नामजपाला आरंभ केला.
आईला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे तिच्या शरिराची उजवी बाजू निकामी झाली होती. तिला जेवण भरवायला लागायचे. तेव्हा गुरुदेवांनी निरोप दिला, ‘‘आईला डाव्या हाताने सर्व कृती करायची सवय लावायला सांग.’’ त्याप्रमाणे आईने लगेच डाव्या हाताने जेवण्यास प्रारंभ केला.
३. कुडाळ सेवाकेंद्रातील वास्तव्य
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन म्हणून कुडाळ सेवाकेंद्रात रहाणे : गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२१ च्या नवरात्रीनंतर आम्ही आईला कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आणले. तेथे आईच्या समवेत माझी पत्नी सौ. श्रावणी राहिली. आई सेवाकेंद्रात कधीच राहिली नव्हती, तरीही गुरुदेवांचे आज्ञापालन म्हणून ती सेवाकेंद्रात राहू लागली. ती प्रतिदिन सकाळी आवरल्यावर नामजप करायची, दुपारी थोडी विश्रांती घेतल्यावर सायंकाळी आरतीला जायची, त्यानंतर थोडा वेळ खोलीच्या बाहेर बसायची आणि रात्री जेवण करून झोपायची.
३ आ. तिला बोलता येत नव्हते; पण ती प्रेमळ असल्यामुळे सर्व साधकांशी तिची लगेच जवळीक झाली.
३ इ. सेवाकेंद्रात आल्यावर शारीरिक स्थितीत सुधारणा होणे : आईमध्ये हळूहळू पालट होत गेला. प्रथम ती आधार घेऊन चालायची. त्यानंतर ती एका हातात काठी घेऊन चालण्याचा प्रयत्न करू लागली. प्रारंभी तिला काहीच बोलता येत नव्हते. नंतर ती बोलण्यासाठी प्रयत्न करू लागली. पूर्वी तिला केवळ ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप म्हणता येत असे. सेवाकेंद्रात आल्यानंतर ती एकेका साधकाचे नाव उच्चारू लागली
३ ई. आई सतत आनंदी असायची. ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप अखंड करायची.
३ उ. अर्धांगवायूचा तिसरा झटका येणे : आई कुडाळ सेवाकेंद्रात असतांना तिला अर्धांगवायूचा तिसरा झटका आला. त्यानंतर तिला स्वतःचे स्वतः काहीच करता येत नव्हते, तरीही ती स्वतः अंथरुणावरून उठण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करायची.
३ ऊ. प.पू. गुरुदेवांची आठवण काढली, तरी आईचा भाव जागृत व्हायचा.
३ ए. गुरुदेवांनी त्यांचे छायाचित्र आईला पाठवून ‘मी समवेतच आहे’, असा निरोप देणे आणि त्या वेळी आईची भावजागृती होणे : ‘गुरुदेवांना भेटावे’, असे आईला वाटत होते; पण आजारपणामुळे ती त्यांना भेटू शकत नव्हती. त्यामुळे गुरुदेवांनी त्यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र तिच्यासाठी पाठवले. त्या वेळी त्यांनी निरोप दिला, ‘‘आईला सांग, ‘मी समवेतच आहे. काळजी करू नका. पुढे तुम्ही देवतांच्या समवेत असणार.’’ १७.१.२०२१ या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते आईला प.पू. गुरुदेवांचे छायचित्र देण्यात आले आणि गुरुदेवांचे वरील उद्गार तिला सांगितले. त्या वेळी आईची भावजागृती झाली.
३ ऐ. आईमध्ये जाणवलेला पालट : पूर्वी आईला सर्वांच्या आधी जेवण भरवावे लागायचे. त्यानंतर आईमध्ये पालट झाला. ती सर्वांचे जेवण होईपर्यत थांबायची आणि नंतर स्वतःला जेवण भरवायला सांगायची.
३ ओ. अनुभूती : आईला स्नान घालतांना मला आईच्या जागी गुरुदेवांचे दर्शन व्हायचे. आईलाही स्नान घातल्यावर पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळायची.
४. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
४ अ. आईचा नामजप अखंड चालू असणे आणि तिच्या शेजारी बसल्यावर नामजप आपोआप चालू होणे : आई कुडाळ सेवाकेंद्रातून घरी आल्यावरही तिचा नामजप अखंड चालू होता. हळूहळू तिची शक्ती न्यून झाली. आईला काही हवे असल्यास ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असे म्हणायची. नोव्हेंबर २०२२ पासून आईचा नामजप आतून होऊ लागला. ती ध्यानावस्थेतच बसलेली असायची. मी तिच्या बाजूला बसलो, तरी माझा नामजप आपोआप चालू होऊन माझे मन स्थिर व्हायचे.
४ आ. तिला पुष्कळ वेदना व्हायच्या; पण ती नामजपाच्या आनंदात असायची.
४ इ. आईला वेदना होऊ नयेत; म्हणून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिच्यासाठी ‘महाशून्य’ हा नामजप प्रतिदिन २ घंटे करण्यास सांगितला. तेव्हापासून आईच्या वेदना थोड्या न्यून झाल्या.
५. निधनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
५ अ. २५.१०.२०२३ या दिवशी मी तिला तांदुळाच्या पेजेचे पाणी पाजले. ते तिने ग्रहण केले.
५ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिलेल्या विभूतीचे तीर्थ ५ मासांनंतर प्रथमच प्राशन करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आईसाठी विभूती दिली होती. ती विभूती पाण्यात घालून त्याचे तीर्थ आईला द्यायला सांगितले होते. ‘हे तीर्थ आईला दिल्यास गंगाजल दिल्याप्रमाणे होईल’, असे सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले होते; पण आईची गिळण्याची क्षमता न्यून झाल्याने तिला ५ मास पाणी पिताच येत नव्हते. त्यामुळे तिला विभूतीचे तीर्थ देता येत नव्हते.
२५.१०.२०२३ या दिवशी आईला विभूतीचे तीर्थ पाजल्यावर ५ मासांनंतर प्रथमच तिने ते प्राशन केले. आईने दोन पेले विभूतीचे तीर्थ एकही थेंब तोंडातून बाहेर न काढता प्राशन केले. पूर्वी तिला पाणी पाजल्यावर अर्धा चमचा पाणी तिच्या तोंडात जायचे आणि बाकी सर्व पाणी बाहेर यायचे.
५ इ. श्वास घेण्यास त्रास होऊ लागणे आणि सद्गुरु गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर त्रास न्यून होणे : त्यानंतर रात्री ९.४५ वाजता आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आई जोरजोरात श्वास घ्यायला लागली. त्या वेळी आईचा चेहरा आणि हात यांवर अनेक सोनेरी दैवी कण दिसत होते. मी सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांना आईची स्थिती कळवली. त्यानंतर त्यांनी गळ्यावर तळहात ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप करण्यास सांगितला. त्याप्रमाणे नामजप केल्यावर रात्री १०.४५ वाजता तिचे जोरात श्वास घेण्याचे प्रमाण न्यून झाले.
६. निधन
रात्री ११.३० वाजता आम्ही तिन्ही भावांनी मिळून तिला तिचे ‘डायपर’ (मल-मूत्र शोषून घेण्याचे वस्त्र) पालटण्यासाठी आसंदीवर बसवले. त्याच वेळी तिचे निधन झाले.
७. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. मला आणि कुटुंबियांना आईचा चेहरा प्रसन्न वाटत होता.
आ. मला आणि सौ. श्रावणीला (पत्नीला) वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
इ. ‘आईला तेल लावत असतांना आमच्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे आम्हा दोघांना (मला आणि पत्नीला) जाणवत होते.
ई. घरातील सर्वांनाच घरात पुष्कळ शांत वाट होते आणि वातावरणात चैतन्य जाणवत होते.
उ. माझ्या मोठ्या भावाने (श्री. महेश परब यांनी) आईला अग्नी दिला. त्या वेळी सर्वांना स्मशानात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्या वेळी वातावरण शांत होते.
ऊ. संतांचा देहत्याग झाल्यावर वातावरणात जसे चैतन्य जाणवते, तसे आईचे निधन झाल्यावर वातावरणात चैतन्य जाणवत होते.’
– श्री. रामानंद परब ((कै.) श्रीमती नंदा परब यांचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण !‘आईला अर्धांगवायू झाल्यामुळे स्वतःचे स्वतः काही करता येत नव्हते. बाबांचे निधन झाल्यावर आई माझ्या भावाच्या समवेत (श्री. गोविंद परब यांच्या समवेत) घरी रहात होती. एकदा एका सेवेच्या निमित्ताने माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी माझ्याकडे आईच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. तेव्हा मी त्यांना आईची स्थिती सांगितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘आईचे पुढे कसे होणार ? तिला कोण बघणार ?’, असे तुझ्या बाबांना वाटायचे ना ? यापुढे आईला आपण सांभाळूया.’’ याआधी मी ‘आईचे पुढे कसे होणार ?’, हे माझ्या बाबांचे वाक्य गुरुदेवांना कधीच सांगितले नव्हते. यातून गुरुदेवांचे द्रष्टेपण माझ्या लक्षात आले.’ – श्री. रामानंद परब ((कै.) श्रीमती नंदा परब यांचा मुलगा)(३१.१०.२०२३) |
आईच्या निधनानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना जाणवलेले सूत्र‘आईच्या निधनानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी विचारपूस करण्यासाठी रात्री भ्रमणभाष केला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घरातील वातावरणाचे परीक्षण केल्यावर त्यांना वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि शांती जाणवली.’ गंभीर आजारपणातही आईने केलेली आध्यात्मिक प्रगती !‘वर्ष २०१९ मध्ये आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर कुडाळ सेवाकेंद्रात आल्यावर वर्ष २०२१ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी एका मासातच २ टक्के वाढून ती ६३ टक्के झाली. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६४ टक्के होती आणि मृत्यूसमयी ती ६५ टक्के होती.’ – श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |