अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग

वैद्य समीर परांजपे

‘अगरु किंवा अगरवूड, म्हणजे उदाचे वृक्ष हे प्रामुख्याने पुष्कळ पाऊस असणार्‍या आसाम, मेघालय अशा भागांत आढळते. हे वृक्ष २५ ते ३० फूट उंच असतात. आपल्याकडे कोकणासारख्या पावसाळी प्रदेशात या वनस्पतीची लागवड करता येऊ शकते आणि यात तुळस, ब्राह्मी, अनंतमूळ, कंटकारी, दूर्वा, बावची, मोहरी इत्यादी वनस्पती अंतर्गत पीक म्हणून लावता येतात.

अगरु वनस्पतीचा उपयोग

याची पाने कडू आणि तिखट रसाची असल्यामुळे प्राणी ती खात नाहीत. हे झाड लावल्यापासून ३ वर्षांनंतर त्याची पाने परिपक्व झाल्यावर त्यांचा औषधी काढा करून चहाचा पर्याय म्हणून ‘अगरवूड ग्रीन टी’ म्हणून वापरला जातो. हा उत्साहवर्धक आणि कफ विकार (सर्दी, खोकला आणि श्‍वसनासंबंधित विकार) नाशक असतो.

अगरूचा उपयोग अनेक वातशामक औषधी कल्प आणि तेल बनवण्यासाठी केला जातो. कंबरदुखी, मानदुखी, स्नायूंचे दुखणे इत्यादी वातव्याधी, त्वचाविकार आणि रक्त वाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे, या विकारांमध्ये या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. गुडघे दुखी, ‘युरिक अ‍ॅसिड’ (शरिरातील १ टाकाऊ घटक जो मूत्राद्वारे बाहेर फेकला जातो.) वाढणे, सांधे आणि मणका यांचे विकार यांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करता येतो. अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि त्यातून पुढे अगरबत्ती किंवा उदबत्त्या बनवता येतात. अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ (२०.२.२०२३)

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी.

(इ-मेल : drsameerparanjape@gmail.com)