उमेदवारांच्या छायाचित्राला लिंबू, दोरा, हळद-कुंकू लावून करणीचा प्रकार !
सांगली आणि कोल्हापूर येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील प्रकार !
सांगली – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लिंबू, दोरा, हळद-कुंकू आणि उमेदवाराचे छायाचित्र एकत्र करून करणी केल्याच्या २ घटना सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यांत निदर्शनास आल्या.
१. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील हरीपूर गावात ३ नोव्हेंबर या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावाच्या वेशीवर बाहुल्या आणि हळद कुंकू आढळून आले. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ४ महिला उमेदवार सरपंचपदासाठी उभ्या आहेत. २ नोव्हेंबर या दिवशी गावाच्या वेशीवर वरील प्रकार गावकर्यांच्या निदर्शनास आला. यावर निवडणुकीला उभे असलेले मोहिते गटाचे उमेदवार सचिन फाकडे यांनी या सर्व बाहुल्या एकत्र करून पेटवून देत ‘अशा अंधश्रद्धांना ग्रामस्थ थारा देणार नाहीत’, असे सांगितले.
२. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावात ग्रामपंचायत निवडणुकीची दुरंगी लढत आहे. या गावातही असाच प्रकार दिसून आला. ४ नोव्हेंबर या दिवशी निवडणूक केंद्राबाहेर उमेदवारांचे छायाचित्र कापलेल्या कोहळ्यात घालून त्यावर गुलाल, हळद-कुंकू लावून लिंबू, दोरे, खिळे, दामण लावून विशिष्ट पद्धतीने ठेवलेले आढळून आले. सकाळी हा प्रकार काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नंतर हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले.