घटस्फोट : धर्म पालटल्यास

‘हिंदु विवाह कायद्या’प्रमाणे हिंदु धर्मातील ज्यांना लग्नानंतर घटस्फोट हवा आहे, त्यांना काही विशिष्ट कारणे दिलेली आहेत. २३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी आपण घटस्फोट घेण्यामध्ये ‘वेडसर’पणाच्या कारणाविषयीची माहिती वाचली. ‘हिंदु विवाह कायदा’ हा हिंदु धर्मासमवेत जैन, शीख आणि बौद्ध यांनाही लागू पडतो. या कायद्याप्रमाणे धर्म पालटल्यास, म्हणजे ‘चेंज ऑफ रिलीजन’ केल्यास या कारणामुळे घटस्फोट मिळवता येतो.

१. घटस्फोट मिळण्यासाठी विविध कारणे

‘हिंदु विवाह कायदा १९५५’प्रमाणे घटस्फोट मिळण्यासाठी विविध कारणे (ग्राऊंड्स) दिलेली आहेत. त्याप्रमाणे पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणीही एकाने किंवा दोघांनी स्वखुशीने धर्म पालटल्यास आणि त्यापैकी कुणासही घटस्फोट हवा असल्यास त्याला किंवा तिला न्यायालयातून घटस्फोटाचा निर्णय (डिक्री) मिळू शकतो. केवळ या गोष्टी न्यायालयात सिद्ध करणे आवश्यक असते. पुष्कळदा असे लक्षात येते की, ज्या व्यक्तीने धर्म पालटला आहे, ती व्यक्ती परागंदा झालेली आहे किंवा ती व्यक्ती कुणासमवेत तरी धर्म पालटून रहात आहे अथवा न्यायालयाच्या समन्सला वा घटस्फोटाच्या याचिकेला ती व्यक्ती दाद देत नाही आणि न्यायालयातही येत नाही, तसेच संपर्कही करत नाही, अशा घटना पुष्कळ प्रमाणात घडत असतात. त्यामुळे त्याने किंवा तिने धर्म पालटला आहे, हे सिद्ध करण्याचे दायित्व दावा प्रविष्ट करणार्‍या पक्षकाराचे असते. कायद्याच्या पुस्तकाप्रमाणे जी व्यक्ती सलग ७ वर्षे बेपत्ता असेल किंवा जिचा ठावठिकाणा ठाऊक होत नसेल, ‘जिवंत आहे कि मृत्यू पावला ?’, हेही समजत नसेल, एकंदरीत सलग ७ वर्षे कायदेशीर भाषेत तो ‘गुप्त’ असेल, अशी व्यक्ती ही ‘एक्स् पार्टी’ (एकतर्फी) घटस्फोटाला मान्यता पावते. ‘हिंदु विवाह कायदा’ हा मुसलमान आणि ख्रिस्ती पंथियांना लागू पडत नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

२. गोव्यामध्ये वापरण्यात येणारा पोर्तुगीज नागरी संहितेतील ‘कौटुंबिक कायदा’ !

पोर्तुगीज कायदा मात्र समान नागरी कायद्याचा पुरस्कर्ता असल्याने गोव्यात प्रत्येक धर्मियांचे लग्न ‘रजिस्टर्ड’ (नोंदणी) करावे लागते आणि याच कायद्याच्या साहाय्याने न्यायालयातून घटस्फोट घेऊन तोडावे लागते. गोव्यात ‘सीपीसी कोड’प्रमाणे (नागरी प्रक्रिया संहिता) ‘पोर्तुगीज नागरी संहिता’ आहे. यातील ‘कौटुंबिक कायदा’ (फॅमिली लॉ) या प्रकरणात घटस्फोटाची कारणमीमांसा विशद केलेली आहे. ज्यामध्ये नवरा-बायको घटस्फोट घेत असतांना ‘तुझे तुला-माझे मला’, या तत्त्वाने ‘सेपरेशन ऑफ प्रॉपर्टीज’चाही (मालमत्तेचे वर्गीकरण) दावा प्रविष्ट करू शकतात, नाही तर पुढे ‘इन्व्हेंटरी’चा (मालमत्तेची सूची करण्याचा) पर्याय जोडप्यांना असतो.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

३. गोव्यातील कायद्यात सुटसुटीतपणा आवश्यक !

‘हिंदु विवाह कायद्या’पेक्षा ‘पोर्तुगीज फॅमिली लॉ रिलेटेड टू डिव्होर्स’ (घटस्फोटाशी संबंधित पोर्तुगीज कौटुंबिक कायदा) जरासा किचकट आहे. खरे तर समान नागरी कायद्याच्या बडग्यात या कायद्यामध्ये ही सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे. सध्या ‘चट मंगनी-पट ब्याह’ (लागलीच साखरपुडा आणि विवाह) होत असतो. त्याच समवेत पटकन घटस्फोट, विवाहानंतर नाममात्र घटस्फोट किंवा लगेच विभक्त होण्याच्या घटनांमध्येही पुष्कळ वाढ झाली आहे. पोर्तुगीज कौटुंबिक कायद्याप्रमाणे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी लग्नाला न्यूनतम ५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात. त्यामुळे या नियमाचीही येथे अडचण निर्माण होते. ही अट कायद्याने शिथिल करणे आवश्यक आहे. थोडक्यात २१ व्या शतकातील सामाजिक पालट बघता गोव्यातील कायद्यात सुटसुटीतपणा आणणे आणि तो कालानुरूप करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.