सिंधुदुर्ग : कलमठ येथील शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !
विदेशी चलन मिळवण्याची हाव पडली महागात !
कणकवली : वाढदिवसासाठी भेट पाठवल्याचे सांगून तालुक्यातील कलमठ येथील एका शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत टप्पाटप्प्याने ही रक्कम त्या शिक्षिकेने एक व्यक्ती आणि एक महिला, अशा दोघांच्या बँक खात्यावर पाठवली आहे. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कलमठ येथील त्या शिक्षिकेला गणेशोत्सवाच्या कालावधीत एका व्यक्तीने ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर संदेश पाठवला होता. त्याला त्या शिक्षिकेने प्रतिसाद (रिप्लाय) दिला. त्यानंतर ती व्यक्ती आणि संबंधित शिक्षिका यांच्यामध्ये ‘व्हॉट्सॲप’वर बोलणे (चॅटिंग) चालू होते. ख्रिस अँड्रीज नावाच्या व्यक्तीने ‘ऑक्टोबर मासात माझा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी सर्व मित्रांना ५० सहस्र पाऊंड (अंदाजे ५१ लाख रुपयांहून अधिक) किंमत असलेली वाढदिवसाची भेट पाठवली आहे. तुम्हालाही पाठवणार आहे. तुमचा पत्ता द्या’, असे त्या शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने स्वत:चा पत्ता त्या व्यक्तीला पाठवला. त्यानंतर त्या व्यक्तीने ‘लवकरच वाढदिवसाची भेट तुम्हाला घरी मिळेल’, असे सांगितले.
९ ऑक्टोबर या दिवशी त्या शिक्षिकेला एका महिलेचा भ्रमणभाष आला. त्या महिलेने हिंदी भाषेतून संभाषण करत ‘मी कस्टम कार्यालयातून बोलत आहे. तुमच्या नावे लंडन येथून एका व्यक्तीने भेट पाठवली आहे. ते स्कॅन केल्यावर त्यात ५० सहस्र पाऊंड विदेशी चलन आढळून आले आहे. विदेशातून नियमबाह्यरित्या चलन मागवल्याच्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो; परंतु मी हे प्रकरण मिटवते, तसेच भेटीच्या (गिफ्टच्या) माध्यमातून आलेले विदेशी चलन तुम्हाला मिळवून देऊ, त्या बदल्यात ५ लाख रुपये कस्टम ड्युटी (शुल्क) आणि इतर कर भरावे लागतील.
यानंतर घाबरलेल्या त्या शिक्षिकेने त्या महिलेने पाठवलेल्या खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण ३८ लाख ३ सहस्र ५०० रुपयांची रक्कम पाठवली. ही रक्कम पाठवल्यानंतरही पुन्हा १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने स्वत:ची फसवणूक झाल्याचे त्या शिक्षिकेच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर त्या शिक्षिकेने ती व्यक्ती आणि महिला यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.