‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे जन्महिंदूंसह धर्मांधांचा झालेला जळफळाट
‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने नेहमी आकांडतांडव करणार्या तथाकथित जन्महिंदूंना हिंदूंचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मात्र कधीही मान्य होत नाही. हिंदूंनी निर्माण केलेली एखादी साहित्यकृती, चित्रपट, हिंदूंचे एखादे भाषण किंवा वक्तव्य असो किंवा त्यांनी एखादे गायलेले गाणे असो, त्यातून त्यांच्यावरील अन्यायाचे परखडपणे वास्तव चित्रण झालेले असेल, तर या जन्महिंदूंना ते पचवणे फार कठीण जाते. काही मासांपूर्वी प्रदर्शित झालेला विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट हे याचे ताजे उदाहरण आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातून समोर आले काश्मीरमधील हिंदूंचे विदारक वास्तव !
वर्ष १९९० च्या आरंभी काश्मीरमध्ये तेव्हा १० टक्के असणार्या हिंदूंचा मुसलमानांकडून प्रचंड नरसंहार झाला. मशिदीवरील ध्वनीयंत्रणेवरून ‘हिंदूंना त्यांच्या बायका-मुलींना काश्मीरमध्ये ठेवून काश्मीरच्या खोर्यातून निघून जा’, ‘धर्मांतर करा किंवा मरायला सिद्ध व्हा’ किंवा ‘येथून नेसत्या वस्त्रानिशी निघून जा’ असे ३ पर्याय जिहाद्यांकडून काश्मीरमधील हिंदूंसमोर ठेवण्यात आले होते. काश्मीरमधील हिंदूंनी काय गुन्हा केला होता ? त्यांनी बाँबस्फोट केले होते कि त्यांनी मुसलमानांचा छळ केला होता कि त्यांच्या हत्या केल्या होत्या ? त्यांचा एकच गुन्हा होता की, ते धर्माने हिंदु होते आणि काश्मीरमध्ये ते अल्पसंख्य होते ! मुसलमानबहुल भागांत अल्पसंख्य असणार्या ‘काफिरां’ना स्वतःचे आणि स्वधर्माचे स्वतंत्र अस्तित्व जोपासू देणे, हा इस्लामनुसार मोठा आणि जघन्य अपराध आहे. याच अपराधाची शिक्षा हिंदूंना अत्यंत अमानुषपणे भोगावी लागली. काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या केवळ जिहादी मानसिकतेतून झाल्या !
५ लाख हिंदूंना त्यांची घरेदारे, सफरचंदांचे मळे आणि उद्योग व्यवसाय सोडून नेसत्या वस्त्रानिशी कसेबसे त्यांचा जीव वाचवत काश्मीरचे खोरे सोडून भारतातील विविध राज्यांत विस्थापित व्हावे लागले. ना रहायला घर, ना खायला अन्न, अशी त्यांची अवस्था होती. या अवस्थेत जगावे लागल्याने अनेक हिंदु स्त्री-पुरुष आणि बालक यांचे मृत्यू झाले. हिंदूंनी काश्मीर खोर्यातून निघून जावे म्हणून सहस्रो हिंदूंना क्रूरपणे ठार मारण्यात आले. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. पतीसमोर पत्नीवर, आई-वडिलांसमोर मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले. त्यांच्या शरिराची करता येईल, तेवढी विटंबना करण्यात आली. गिरजा हिक्कू या हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या देहाचे यंत्रावर तुकडे तुकडे करण्यात आले.
काश्मीरमधील हिंदूंवर जे अमानुष अत्याचार झाले, त्यांचा केवळ १० टक्के भाग आणि तोही प्रतिकात्मकरित्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. १०० टक्के अत्याचार आणि त्यातील अमानुषता दाखवली गेली असती, तर संवेदनशील मनाला ती पहाणे सहन झाले नसते अन् परीनिरीक्षण मंडळानेही ते मान्य केले नसते; पण या चित्रपटात जेवढे दाखवले आहे, ते पाहूनही अनेक स्त्रियांना रडू कोसळले. तसेच अनेक पुरुषांचा संताप अनावर झाला. महंमद बिन कासिम, कुतुबुद्दीन ऐबक, महंमद गझनी, अल्लाउद्दीन खिलजी, तैमुरलंग, बाबर, अकबर, औरंगजेब, हैदरअली आणि टिपू सुलतान असे अनेक क्रूर इस्लामी आक्रमक अन् शासक यांनी हिंदूंच्या केलेल्या नृशंस कत्तली आणि त्यांचे अमानुष अत्याचार यांच्या कहाण्या इतिहासाच्या पानोपानी पहाण्यात आल्या होत्या; पण आश्चर्य म्हणजे ७ व्या शतकापासून ते आजच्या विज्ञानयुगाच्या २१ व्या शतकापर्यंतही धर्मांधांच्या क्रूरतेत आणि मानसिकतेत यत्किंचित्ही फरक पडलेला नाही ! हे वास्तव ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगाच्या समोर आले.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर धर्मांधांच्या सुरात सूर मिसळवणारे जन्महिंदू !
तत्कालीन हिंदुद्वेष्टे शासनकर्ते आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी काश्मीरमधील हिंदूंचा झालेला हा नरसंहार भारतियांसह जगापुढे येऊ दिला नव्हता. तो दाबून टाकला होता; पण ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने तो जगासमोर उघड झाला. स्वतःची क्रूरता, धर्मांधता आणि अमानुषता या चित्रपटामुळे परत एकदा जगजाहीर झाल्यामुळे मुसलमान मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि धर्मांध नेते यांनी या चित्रपटाला विरोध करणे अन् ‘या चित्रपटामुळे हिंदु समाजात मुसलमानांविषयी द्वेषभाव वाढीस लागेल’, अशी ओरड करणे चालू केले. विशेष म्हणजे मुल्ला-मौलवींच्या सुरांत अनेक जन्महिंदूनींही त्यांचा सूर मिसळल्याचे पाहून मोठे आश्चर्य वाटले आणि चीडही आली ! धर्मांध मुसलमानांनी काश्मीरमध्ये हिंदूंचा अमानुष संहार केला, तेव्हा समाजात द्वेष न वाढता भाईचारा वाढला होता का ? मग ‘हिंदूंच्या संहारावर आधारित चित्रपट बनवल्यामुळेच समाजात द्वेष वाढेल’, अशी ओरड करणे, याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असेच म्हणावे लागेल. अशी ओरड करणे, म्हणजे निर्लज्जपणाची परिसीमा गाठणे होय. ‘धर्मांधांनी हिंदूंचा केवळ ते हिंदु आहेत; म्हणून अमानुष संहार करावा, त्यांच्या स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करावेत, त्यांच्या देहाची बीभत्सपणे विटंबना करावी; पण हिंदूंनी मात्र कोणत्याही कलाकृतींद्वारे या नरसंहाराची कुठेही वाच्यता करू नये, हिंदूंनी सारे अत्याचार चूपचाप सहन करावेत’, असे या धर्मांध नेत्यांचे आणि त्यांच्या सुरात सूर मिळवणार्या धर्मद्रोही जन्महिंदूंचे म्हणणे आहे का ?
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याला विरोध करून हिंदूंना त्रास देणारे धर्मांध आणि जन्महिंदू !
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतातील काही भागात जातीय तणाव निर्माण झाला. काही भागात चित्रपट पाहून येणार्या युवकांना विशिष्ट धर्मियांनी मारहाण केली. ‘आतंकवाद्यांचा कोणताही धर्म नसतो’, असे म्हणून अनेक जन्महिंदू नेहमी आतंकवाद्यांची बाजू घेऊन त्यांचे समर्थन करतात. ‘मग ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला विशिष्ट धर्माचेच लोक विरोध का करतात ?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र हे जन्महिंदू कधी देत नाहीत. एका गावात हा चित्रपट पाहून येत असतांना काही युवकांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे कुणाचे पोट दुखत असेल, तर त्याला भारतीय कसे म्हणता येईल ? पण त्या गावातील पोलिसांनी घोषणा देणार्या युवकांवर गुन्हे नोंद केले.
लोकप्रतिनिधींची चित्रपटावरील दायित्वशून्य विधाने !
या चित्रपटासंबंधी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री विधानसभेत म्हणाले, ‘‘ मी हा चित्रपट पाहिला नाही; पण तो भारताची वर्ष १९४७ मध्ये जी फाळणी झाली, त्या पार्श्वभूमीवर आधारित असावा, असे मला वाटते.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘द काश्मीर फाइल्सप्रमाणे गुजरातच्या दंगलीवरही ‘द गुजरात फाइल्स’ असा चित्रपट बनवायला पाहिजे.’’ हिंदूंनी गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीत मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता आणि हा पवित्रा अनेक जन्महिंदूंना सहन झाला नाही’, असे यावरून दिसून आले.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.