ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्यासाठी बसने प्रवास करतांना साधकांनी अनुभवलेला भावानंद आणि अनुभवलेली आध्यात्मिक स्तरावरची जवळीकता !
मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !
(भाग ४)
१. ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी निघालेल्या साधकांची बसमधील प्रवासाची रूपरेषा
‘प्रवासातही साधकांचे साधनेचे प्रयत्न व्हावेत, साधकांना गुरूंचे अस्तित्व अनुभवता यावे, साधकांचा एकही क्षण वाया जाऊ नये अन् त्यांना आनंद घेता यावा’, यासाठी प्रत्येक बसमधील साधकांना प्रार्थना, नामजप, स्वयंसूचना सत्र, भावजागृतीचा प्रयोग, भ्रमणभाषद्वारे करण्यासारख्या काही सेवा असल्यास त्या करणे आणि स्वतःच्या चुका भ्रमणभाषमध्ये टंकलिखित करणे अथवा शक्य असल्यास लहान वहीत लिहिणे अशा स्वरूपाचे नियोजन करून दिले होते.
२. प्रवासात रूपरेषेनुसार कृती करतांना साधकांनी अनुभवलेली सूत्रे
२ अ. संपूर्ण प्रवासात भावमय वातावरण असणे आणि साधकांनी ‘वेगळ्याच लोकात आहोत’, असे अनुभवल्याचे सांगणे : सर्व साधकांना प्रवासात करावयाचे साधनेचे नियोजन पाठवले होते. साधकांनी सांगितले, ‘‘नियोजनानुसार दिवसभरात कृती केल्यानंतर ‘आम्ही १० घंट्यांचा प्रवास करून आलो आहोत’, असे आम्हाला वाटलेच नाही. ‘हा प्रवास संपूच नये’, असे आम्हाला वाटत होते. ‘संपूर्ण प्रवासात भावमय वातावरण होते. ते अनुभवतांना आम्ही वेगळ्याच लोकात आहोत’, असे जाणवले.’’
२ आ. साधकांचा प्रेमभाव : साधकांनी जेवणाचा डबा केवळ स्वतःपुरता न आणता सर्वांना देता येईल, अशा प्रमाणात आणला होता. सर्व जण उत्साहाने आणि आनंदाने साधकांच्या जवळ जाऊन त्यांना जेवण वाढत होते. साधकांना ‘एकमेकांसाठी काय करू आणि काय नको ?’, असे वाटत होते.
२ इ. लहान मुलांनी प्रवासात त्रास न देता मिळून मिसळून रहाणे : बसमध्ये अनेक साधकांची लहान मुलेही होती; परंतु या दैवी प्रवासातील सात्त्विक वातावरणामुळे मुलांनी कोणताच त्रास दिला नाही. ती मुलेही नियोजनात चांगल्या प्रकारे सहभागी होत होती. ती सर्व साधकांमध्ये मिळून मिसळून रहात होती.
२ ई. साधक एकमेकांसाठी करत असलेल्या कृतींमधून त्यांनी ‘गुरुदेवांचे सनातन कुटुंब’ ही भावना अनुभवणे : एखाद्या साधकाला काही त्रास होत असल्यास साधक लगेच त्याला साहाय्य करायचे आणि त्याची काळजी घ्यायचे. ‘कुणाला काही हवे आहे का ?’, असे साधक एकमेकांना सतत विचारायचे. बसमध्ये पुढच्या आसंदीवर बसलेले साधक थोडा वेळ मागच्या आसंदीवर बसण्यासाठी जात होते आणि मागे बसलेल्या साधकांना पुढे बसायला पाठवत होते. साधक करत असलेल्या कृतींमधून ‘गुरुदेवांचे सनातन कुटुंब’ अनुभवता आले. ‘गुरुदेवांनीच सर्व साधकांमध्ये एकमेकांप्रती प्रेमभाव, जवळीक आणि आत्मीयता निर्माण केली’, याची अनुभूती सर्व साधकांना घेता आली.
२ उ. कुडाळ येथील साधकांनी ब्रह्मोत्सवासाठी येणार्या साधकांच्या निवासव्यवस्थेसाठी भावपूर्ण साहाय्य करणे : ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी १० घंटे बसचा प्रवास करून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून साधक येणार होते. त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निवासाची व्यवस्था केली होती. त्या नियोजनात कुडाळ येथील साधकांनी पुष्कळ भावपूर्ण साहाय्य केले.
२ ऊ. साधकांची परात्पर गुरुदेवांना भेटण्याची ओढ ! : ‘निवासाच्या ठिकाणाहून सकाळी सर्वांनी स्वतःचे वैयक्तिक आवरून आणि अल्पाहार करून सकाळी ९ वाजता गोव्याला जाण्यासाठी निघायचे’, असे नियोजन केले होते. वरीलप्रमाणे नियोजन असतांनाही साधकांना ‘कधी एकदा गोवा येथे पोचतो !’, असे वाटत होते. साधक निवासाच्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना झोपही लागत नव्हती. ‘काही साधक सर्वांचे लवकर आवरले पाहिजे आणि वेळेत निघायचे आहे’, या तळमळीने मध्यरात्री २ – ३ वाजता उठून वैयक्तिक आवरून नामजप करायला बसले होते.
साधिका पहाटे ३ वाजता उठल्या आणि अंघोळ करून, काठापदराच्या साड्या नेसून, गजरे घालून अन् अलंकार परिधान करून पहाटे ४ वाजता सिद्ध होऊन बसल्या होत्या. त्यांच्यात गुरुमाऊलींप्रतीचा भाव जाणवत होता. अनेक साधक आणि साधिका वयस्कर होत्या, तरीही त्यांच्यातील उत्साह आगळावेगळाच होता. सकाळी उठून ब्रह्मोत्सवासाठी जायचे असल्याचा आनंद सर्व साधकांच्या चेहर्यावर आणि वागण्या-बोलण्यातून जाणवत होता.
३. साधकांनी प्रवासात सामूहिक स्तरावर केलेले भावजागृतीचे प्रयत्न
अ. एका बसमधील एका साधिकेने ‘दैवी प्रवासात आपण सर्व जण श्रीकृष्णाच्या रथात बसलो आहोत’, असा भावजागृतीचा प्रयोग करवून घेतला. त्या वेळी अनेकांना तसे अनुभवता येऊन भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.
आ. एका बसमधील सर्वजण एक ‘भावखेळ’ खेळले. ‘एका साधकाने दुसर्या साधकाला गुरुदेवांच्या व्यासपिठावरील अथवा त्यांच्या देहावरील एक अलंकार किंवा वस्तू सांगणे आणि दुसर्या साधकाने ‘ती आपण स्वतः आहोत’, असा भाव ठेवणे’, अशा प्रकारचा तो खेळ होता. या खेळात ‘स्वतःच्या मनाने मी अमुक एक वस्तू होणार’, असे ठरवायचे नसून सहसाधक जसे सांगेल, तसा भाव सतत अनुभवायचा होता. हा ‘भावखेळ’ खेळतांना सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती आल्या आणि खेळातील आनंद घेता आला.
इ. एका बसमधील सर्व साधकांनी ‘आपला आजवरचा साधनाप्रवास आणि श्री गुरुदेवांनी साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला केलेले साहाय्य आठवूया आणि श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करूया’, यासंदर्भात सांगितले. तेव्हा बसमधील सर्वच साधक भावस्थिती अनुभवत होते.
ई. एका बसमधील साधकांनी ‘प्रथम गुरुभेट झालेल्या क्षणाचे स्मरण करणे’, असा भावजागृतीचा प्रयोग केला. त्या वेळी सर्वांना प्रवासातही श्री गुरूंचे अस्तित्व जाणवू लागले.
४. भगवंताने साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरची जवळीक निर्माण केल्याचे जाणवणे
परतीच्या प्रवासातही साधकांची भावस्थिती टिकून होती. या प्रवासात साधकांची एकमेकांशी जवळीक वाढली होती. गुरुदेव ज्या रथात आरूढ झाले होते, त्या रथाचे ब्रह्मोत्सव झाल्यानंतर दर्शन घेतांना काही साधकांनी रथाच्या चाकाखालची धूळ घेतली. ती त्यांनी सहसाधकांनाही दिली. काही साधकांनी गुरुदेवांवर झालेल्या पुष्पवृष्टीतील फुले घेतली होती. त्याच्या पाकळ्या त्यांनी सहसाधकांनाही आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी दिल्या. ‘यापुढे आणखी जोमाने अध्यात्मप्रसाराची सेवा करूया’, असा दृढ निश्चय साधक करत होते. भगवंताने साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरची जवळीक निर्माण करून दिली. ती श्री गुरूंच्या दिव्य दर्शनामुळे टिकून राहिली.’ (क्रमशः पुढच्या रविवारी)
– कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी,
मुंबई. (११.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |