ठाणे जिल्ह्याधिकार्‍यांच्या नावे बनावट आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

ठाणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते कार्ठायवाहीसाठी ठाणे पोलिसांना पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तहसीलदार संजय भोसले यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कल्याण येथील दुर्गाडी गडासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने एक पत्रक ठाणे पोलिसांना प्राप्त झाले होते. ‘या पत्रकामध्ये गडाजवळ प्रार्थना करण्यास प्रतिबंध करून त्याची कार्यवाही करावी’, असे म्हटले होते, तसेच जिल्हाधिकार्‍यांची स्वाक्षरीही या पत्रकावर होती. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. त्या वेळी असे कोणतेही पत्रक जिल्हाधिकार्‍यांनी काढले नसल्याचे समोर आले. पोलिसांनी पडताळणी केली असता हे पत्रक बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती तहसीलदार संजय भोसले यांना देऊन पुढील कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका :

बनावट आदेश काढणार्‍याला शोधून त्याच्यावर कठोर कारवाईच करायला हवी !