४ आणि ५ नोव्हेंबरला ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’च्या वतीने दत्त सांप्रदायिक स्नेहमेळाव्याचे आयोजन ! 

प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात श्रीविद्या उपासना शक्तिपात आणि श्री दत्त संप्रदाय यांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम’ कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच ४ आणि ५ नोव्हेंबरला ‘श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, विश्वपंढरी’ येथे प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीच्या वतीने दत्त सांप्रदायिक स्नेहमेळाव्याचे (१९ वे वार्षिक अधिवेशन) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष वेदमूर्ती सुहास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी अधिवक्ता केदार मुनीश्वर, डॉ. सुरेश देशपांडे, श्री. दिगंबर जोशी, श्री. दीपक मुळे उपस्थित होते. अधिवक्ता केदार मुनीश्वर म्हणाले, ‘‘भारतातील सर्व दत्तक्षेत्र संस्था आणि सांप्रदायिक संस्थांनी एकत्र येऊन ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’, या संस्थेची स्थापना केली. ४ आणि ५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते दुपारी १, दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रांत विविध व्याख्याने, कीर्तन, चर्चासत्रे होतील. संस्थेच्या वतीने ‘श्री अनघदत्त संदेश’ या पत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित होत आहे.’’