श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ !
रजिस्टर नोंदी आणि सीसीटीव्ही चित्रण यांत तफावत
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी (अतीमहनीय व्यक्ती) दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ चालू असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. व्हीआयपी रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही चित्रण यांमध्ये तफावत आहे. त्यामुळे मंदिरामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन नोंदी आणि सीसीटीव्ही चित्रण यांची शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवीभक्त आणि शहरवासीय यांकडून होत आहे. (अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिर प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
मंदिरातील व्यवस्थेविषयी अणि भोंगळ कारभाराविषयी भाविक-भक्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा रोष आता सामाजिक माध्यमांतून व्यक्त केला जात आहे. व्हीआयपी रांगेतील प्रवेशद्वारातील ८० टक्के सुरक्षारक्षक भ्रष्टाचारी असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. (मंदिर संस्थानच्या अध्यक्षांनी या सर्व गोष्टींची शहानिशा करून मंदिरातील भोंगळ कारभार मोडून काढावा हीच भाविकांची अपेक्षा ! – संपादक)
‘पेड दर्शन पास’ घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ पैसे भरण्याची व्यवस्था नाही !
श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ‘पेड दर्शन पास’ घेतांना मंदिर संस्थानकडे ‘ऑनलाईन’ पैसे स्वीकारण्याची सुविधा नसल्याने भाविकांना अडचणी येत आहेत. सध्या डिजिटल पेमेंटसाठी मोठमोठ्या आस्थापनांपासून ते हातगाड्यांपर्यंत सर्वांकडे ‘स्कॅनर’ बसवण्यात आलेले आहेत; मात्र महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असणार्या श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पेड दर्शन पास घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ पैसे भरण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांची तारांबळ उडत आहे. (यामुळे पेड दर्शन पासमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असावा, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)