जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !
१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय
‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, तसेच सध्या भारताचा चीनशी मोठा तणाव आहे. त्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख येथेही भारतीय सैन्याची तैनाती पुष्कळ आहे. या भागात सैन्य असल्याने सर्वाधिक लाभ तेथील नागरिकांना होतो. जम्मू-काश्मीरमधील सैन्याचे वेतन अनुमाने ३८ सहस्र कोटींहून अधिक आहे. असे समजले जाते की, कुठलाही सैनिक हा त्याच्या वेतनातील २०-२५ टक्के धन तो रहात असलेल्या भागात व्यय करतो. ते ७ सहस्र ५०० कोटी रुपये विविध कामांसाठी व्यय करत असतात. याचा काश्मीरच्या लोकांना फार लाभ होतो.
२. सैन्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दळणवळणाची उत्तम व्यवस्था
याखेरीज सैन्याला त्यांच्या विविध शाखांमध्ये विविध व्यय करावा लागतो. ‘आर्मी फूड सप्लाय’ ही सैन्यासाठी अन्नधान्य खरेदी करते. ‘आर्मी आर्डनन्स स्कोर’ला विविध प्रकारच्या शस्त्रांची देखभाल करावी लागते. त्यासाठी त्यांना सुटे भाग लागतात. ते स्थानिक स्तरावरील बाजारातून खरेदी केले जातात. मोठ्या रुग्णालयांचा वापर सैनिकांसह स्थानिक नागरिकही करतात. त्यांना लागणारी औषधे स्थानिक बाजारातून खरेदी केली जातात. सैन्याकडून विविध भागातील रस्त्यांची दुरस्ती केली जाते. त्यामुळे या भागातील रस्ते चांगले असतात. कोकणच्या डोंगराळ भागात असलेल्या रस्त्यांहून अधिक चांगले रस्ते हे काश्मीरच्या डोंगराळ भागात आहेत. तो सीमावर्ती भाग असल्याने सीमेपर्यंत रस्ते नेण्यात आलेले आहेत आणि या रस्त्यांचा दर्जा अतिशय चांगला आहे. या भागात बर्फ आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे रस्ते खराब होतात. तरीही त्यांची देखभाल जेवढी सैन्य चांगल्या प्रकारे करते, तेवढी कुठेही होत नाही. ‘सीमा रस्ते संघटना’ ही संस्था जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये रस्ते बांधण्याचे काम करते. डोंगराळ भाग असल्याने त्यात बोगदे पुष्कळ असतात. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. असे म्हटले जाते की, ६० सहस्रांहून अधिकांना मजुरीचे काम या भागात मिळते.
३. दीड ते २ लाख लोकांना रोजगाराची संधी
सैन्याच्या गाड्या खराब होऊ नये; म्हणून नागरी गाड्यांचा वापर केला जातो. त्याचे अंदाजपत्रक १७० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे तेथे १ लाखांहून अधिक लोकांना काम मिळते. स्वच्छता कामगार २-३ सहस्रांहून अधिक आहेत. ‘आर्डनन्स डेपो’मध्ये काम करणार्या लोकांची संख्या ४ सहस्रांहून अधिक आहे. वैद्यकीय डेपोमध्ये काम करणारे ७०० ते ८०० आहेत. पुरवठा डेपोमध्ये अनुमाने दीड सहस्र लोक आहेत, म्हणजे दीड ते २ लाख लोकांना तेथे काम मिळते.
४. भारतीय सैन्यात जम्मू-काश्मीरचे योगदान
भारतीय सैन्यात जम्मू-काश्मीरचेही योगदान आहे. भारतीय सैन्यात ‘जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्री’ आणि दुसरी ‘जम्मू-काश्मीर रायफल’ अशा २ रेजिमेंट आहेत. यांच्याच ३७ बटालियन आहेत. याखेरीज ‘टेरिटोरिअल आर्मी बटालियन’ या ७ हून अधिक आहेत. लडाखमधील ‘स्काऊट बटालियन’ ५ हून अधिक आहेत. तेथे अग्नीविरांचीही भरती होत असते. अशा प्रकारे ४० ते ४५ सहस्र लोकांना विविध ठिकाणी काम मिळते. भारतीय सैन्य या भागात असल्याने तेथील जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. अशा प्रकारे जम्मू-काश्मीरच्या प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.