आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू
तेल अविव (इस्रायल) – आम्ही गाझा शहरात आधीच प्रवेश केला आहे. आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.
नेतान्याहू पुढे म्हणाले की, युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत; पण पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हमासचे सैनिक घुसले आहेत. त्यांच्या घराखाली बोगदे निर्माण करण्यात आले असून त्यांत ते लपले आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी पॅलेस्टिनी नागरिक उपस्थित असतांनाही आक्रमण करणे आवश्यकच झाले आहे.
गाझा शहराला इस्रायली सैन्याने घेरले !
इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, आम्ही गाझा शहराला चारही बाजूंनी वेढा घातला असून आता हमासच्या सैनिकांशी थेट युद्ध चालू आहे. आमचे सैनिक हमासच्या पोस्ट, कमांड सेंटर, लॉन्चिंग पोझिशन्स, बोगदे आदींवर शस्त्रे आणि विमान यांच्या साहाय्याने आक्रमण करत आहेत. आम्ही हमासला संपवण्यासाठी युद्धात उतरलो आहोत. अशा वेळी आम्ही युद्धबंदीचा विचारही करू शकत नाही. इस्रायली सैन्याने हमासच्या जवळपास १५० सैनिकांना २ नोव्हेंबर या दिवशी ठार मारले. या युद्धात इस्रायलचे १९ सैनिकही ठार झाले आहेत.
काळ्या पिशव्यांमध्ये इस्रायली सैनिकांचे मृतदेह पाठवणार ! – हमासची दर्पोक्ती
हमासच्या ‘कासिम ब्रिगेड’चा प्रवक्ता अबू ओबैदा याने म्हटले आहे की, गाझावर आक्रमण करणार्या इस्रायली सैनिकांना ठार मारले जाईल आणि त्यांचे मृतदेह काळ्या पिशवीत परत पाठवले जातील. गाझा हा इस्रायलच्या इतिहासाचा शाप बनेल.