दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरामदायी गाड्यांच्या मालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबावा !
|
जळगाव – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी आरामदायी बसगाड्यांच्या मालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक आणि तालुकास्तरीय शासकीय पथक नियुक्त करण्यात यावे, तसेच या पथकाकडून घालून दिलेल्या नियम-अटींचे उल्लंघन होत असेल, तर अशा चालक-मालक, दलाल यांच्यावर थेट कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह संबंधित प्रशासनाकडे केली आहे. देशपातळीवरील वरिष्ठ स्तरापर्यंत याविषयीचे पत्र मान्यवरांना देण्यात आले आहे. (समाजभान जोपासून समाजकर्तव्य पार पाडणारे पत्रकार श्री. संदीप महाजन यांचे अभिनंदन ! – संपादक)
१. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगावहसह सर्व तालुका स्तरावरून अनेक ठिकाणी लांब पल्ल्याच्या आरामदायी गाड्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी सुटतात. ‘राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेसाठी आकारण्यात येणार्या भाड्याच्या कमाल दीडपटपर्यंत भाडे आकारता येईल’, असे प्रावधान असले, तरी ‘प्रवासी सेवा, सुरक्षा याही तशाच द्यायला हव्यात’, असा नियम आहे.
२. बहुतांश कार्यालयाजवळ दिवाळीच्या कालावधीत प्रवासी भाडे दर फलक आणि प्रवाशांना कोणत्या सेवा देण्यात येतात, याचा फलक लावलेला दिसत नाही. काही ठिकाणी दलालांना उभे करून अवाजवी भाडे आकारणी केली जोते. ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध असूनही गाडीतील सर्व आसने भरल्याचे दाखवले जाते. जागा नसल्याचे सांगून प्रवाशांना टाळले जाते. प्रवाशाने गरजेपोटी पैसे दिले, तर लगेच आसन उपलब्ध करून दिले जाते.
भाडे आकारणीविषयीची सारणी प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावावी ! – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणीविषयीची सारणी प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे. खासगी प्रवासी बसगाड्यांची सेवा पुरवणार्या वाहतूकदारांना संबंधित मार्गांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेसाठी आकारण्यात येणार्या भाड्याच्या कमाल दीडपट पर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी बसगाड्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत. ‘अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत खटला प्रविष्ट होईल’, अशी चेतावणी जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
संपादकीय भूमिकाखासगी बसगाड्यांकडून होणारी लूट थांबवण्याविषयी एका पत्रकाराला आवाज उठवावा लागतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! प्रशासन स्वतःहून अशा गोष्टींची नोंद घेऊन कार्यवाही का करत नाही ? |