सर्वोच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अधिवक्त्यांना फटकारले !
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीच्या वेळी अधिवक्त्यांना ‘मला सर्वोच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत फटकारले. अधिवक्त्यांकडून याचिकांवर विविध कारणांमुळे सुनावणीसाठी पुढची दिनांक देण्याची मागणी केली जाते. यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अधिवक्त्यांना फटकारले. ‘फार आवश्यकता असल्यासच सुनावणी स्थगित करण्याची मागणी करावी’, असेही न्या. चंद्रचूड यांनी या वेळी स्पष्ट केले.
सरन्यायाधिशांनी मांडलेली सूत्रे
१. गेल्या २ मासांमध्ये ३ सहस्र ६८८ प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज आले. आमची इच्छा नाही की, हे न्यायालय तारखांवर तारखा देणारे बनावे.
२. नवीन याचिका सूचीबद्ध करण्यास आता वेळ लागत नाही; मात्र जेव्हा त्या सुनावणीसाठी येतात, तेव्हा अधिवक्ते त्या पुढे ढकलण्याची मागणी करतात. ही प्रक्रिया बाहेर जगासाठी चुकीचे उदाहरण ठरते.
३. माझे बार असोसिएशनच्या सदस्यांना सांगणे आहे की, आज (३ नोव्हेंबर) सुनावणी पुढे ढकलण्यासाठी १७८ अर्ज आले आहेत. यावर मी लक्ष ठेवून आहे. बारच्या सदस्यांकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या मासांमध्ये सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रतिदिन १५० अर्ज आले होते. मला वाटते की, ही गोष्ट याचिका प्रविष्ट करून ती सुनावणीसाठी आणण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बाधा पोचवत आहे.