देहली उच्च न्यायालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला विचार करण्याचे निर्देश !

ताजमहालचा योग्य इतिहास प्रकाशित करण्याची हिंदु सेनेची मागणी

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ताजमहालच्या संदर्भात योग्य इतिहास प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आलेल्या याचिकेवर योग्य विचार करणार्‍याचे निर्देश दिले आहेत. हिंदु सेना या संघटनेकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ‘ताजमहाल मोगल बादशाह शहाजहान याने नाही, तर राजपुताना (सध्याचे राजस्थान) येथील कच्छवा वंशाचे क्षत्रिय राजा मान सिंह यांनी बांधला होता. शाहजहान याने नंतर त्याचा जीर्णोद्धार केला होता’, असे म्हटले आहे.

१. उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी यापूर्वी याच प्रकारची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्या वेळी न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे अर्ज करण्यास सांगितले होते.

२. याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पुरातत्व विभागाने अद्यापही अर्जावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने या विभागाला या अर्जावर निर्णय घेण्यास सांगावे.

३. हिंदु सेना संघटनेचे अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. यात त्यांनी न्यायालयाला आग्रह केला आहे की, इतिहासातील पुस्तकांमध्ये ताजमहालाच्या संदर्भातील इतिहास स्वरूपातील चुकीची माहिती हटवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग, केंद्र सरकार, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार आणि उत्तरप्रदेश सरकार यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच भारतीय पुरातत्व विभागाला ताजमहाल किती प्राचीन आहे ? याविषयी, तसेच राजा मान सिंह यांचा महाल यांच्या अस्तित्वाविषयी पडताळणी करण्याचा आदेश देण्याचीही मागणी केली आहे.

४. सुरजित यादव यांचे म्हणणे आहे की, त्यांनी ताजमहालविषयी सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. त्यामुळेच इतिहासातील चुका सुधारणे आणि ताजमहालविषयी योग्य माहिती देणे महत्त्वाचे आहे.

५. यादव यांनी देसाई यांनी लिहिलेल्या ‘ताज संग्रहालय’ नावाच्या पुस्तकाचा याचिकेत उल्लेख केला आहे. यात शाहजहान याची पत्नी मुमताज महल याचे शव पुरण्यासाठी उंच आणि सुंदर जागेची निवड करण्यास सांगण्यात आल्याचा उल्लेख आहे. या आधारे यादव म्हणाले की, अशी जागा मान सिंह यांची हवेली होती. त्या वेळी ती मान सिंह यांचे नातू जय सिंह याच्या कह्यात होती. येथेच मुमताज महल हिचे शव पुरण्यात आले. याउलट पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे की, ताजमहाल वर्ष १६४८ मध्ये बांधून पूर्ण झाले. यासाठी १७ वर्षे लागली.