उच्चशिक्षण संस्थांनी शुल्क आणि अभ्यासक्रम यांची माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक !

पुणे – देशातील उच्चशिक्षण संस्थांना अभ्यासक्रम, शुल्क रचना, शुल्क परतावा धोरण, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, मानांकन श्रेणी, अभ्यासक्रम, शैक्षणिक वेळापत्रक, अभ्यासक्रम माहितीपत्रक, प्रवेश प्रक्रिया, माहिती संशोधन विकास विभाग, शिष्यवृत्ती परिपत्रके आदी संदर्भातील माहिती संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या संदर्भातील धोरण सिद्ध केले असून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत उच्चशिक्षण संस्थांच्या कार्यक्षम आणि पारदर्शक कामासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून सर्व माहिती पारदर्शकरित्या सार्वजनिक करण्यावर भर दिला आहे. हा मसुदा हरकती आणि सूचना यांसाठी खुला असून त्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याचे स्पष्ट केले आहे.