मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी !
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचे दुसर्या दिवशीही मंत्रालयासमोर आंदोलन !
पोलिसांकडून आमदारांची धरपकड !
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवसाचे अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी २ नोव्हेंबर या दिवशी म्हणजे सलग तिसर्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी ‘चक्काजाम आंदोलन’ केले. वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी आमदारांना कह्यात घेतले. १६ आमदार आंदोलनात सहभागी होते.
सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक चालू असतांनाच मंत्रालयात अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली. १ नोव्हेंबर या दिवशी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते. ‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, नाहीतर एकाही मंत्र्याला आत जाऊ देणार नाही’, अशी मागणी करत त्यांनी तिथेच पायर्यांवर ठिय्या मांडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत या आमदारांना कह्यात घेऊन दरवाजा उघडला होता. यानंतर पोलिसांनी या आमदारांना वाहनात बसवून नेले होते. २ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा आमदारांनी मंत्रालयाबाहेर येऊन ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्यांना कह्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा बडगा; ३२ हून अधिक आंदोलकांवर गुन्हे नोंद !
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी विविध आंदोलनात सहभागी झालेल्या ३२ हून अधिक लोकांवर गुन्हे नोंद केले आहेत. हे गुन्हे जमाव जमवणे आणि ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याप्रकरणी आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे गुन्ह नोंद करण्यात आले आहेत.
१. गुन्हे नोंद करण्यात आलेल्यांमध्ये फुलंब्री पोलीस ठाणे क्षेत्रातील एकूण ७ ते ८ लोकांचा समावेश आहे. यात अज्ञात ७ ते ८ लोकांनी बिल्डा फाटा येथे विनापरवाना टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण केला, तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून अनधिकृत कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२. या प्रकरणात अद्याप कुणालाही कह्यात घेण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ९ लोकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता अडवल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे.
३. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असतांना त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भानगडीत पडू नये ! – आबा पाटील, मराठा ठोक मोर्चाचे नेते
मुंबई – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी; पण राजकीय भानगडीत पडू नये. त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेऊ नये. राजकीय नेत्यांवर बोलू नये, असे विधान मराठा ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी २ नोव्हेंबर या दिवशी येथे केले आहे. मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या भूमिकेला मराठा ठोक मोर्चाने विरोध दर्शवला आहे. आबा पाटील यांनी सत्ताधारी भाजपचे समर्थन केले आहे.
ते म्हणाले…
१. मराठा समाजाला मागील ७० वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाने न्याय दिला नाही; पण भाजपने राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जरांगे यांचे आंदोलन पुढील २-३ दिवसांत संपले पाहिजे. मराठा समाज आता आणखी वाट पाहू शकत नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो २-३ दिवसांत घ्या.
२. मराठा आरक्षणासाठी ‘आमरण उपोषण’ करणार्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
३. आरक्षणाच्या सूत्रावर आमची एकजूट आहे. जरांगे यांच्या आंदोलनात काही चुकीची घटना घडली, तर ते सरकारला परवडणार नाही.
मुंबई येथे आमदार निवासाबाहेर हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी ३ जण कह्यात !
मुंबई – मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवासाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तिघांना कह्यात घेतले आहे. हे तिघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत. अजय साळुंखे, संतोष निकम आणि दीपक सहानखुरे अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी ‘त्या तिघांवर कोणतीही कारवाई करू नका’, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ही घटना घडली, त्या ठिकाणी आधीपासूनच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता; मात्र आता या प्रकारानंतर येथे आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई मंत्रालयाच्या अगदी बाजूलाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कातरखटाव (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांचे त्यागपत्र !
सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ६ दिवसांपासून उपोषण चालू होते. या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जिल्ह्यातील कातरखटाव ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० सदस्यांनी त्यागपत्र देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानुसार उपोषणकर्त्यांसमोर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपले त्यागपत्र सरपंच यांच्याकडे सोपवले. लवकरच सरपंचही गटविकास अधिकारी यांच्याकडे आपले त्यागपत्र सोपवणार आहेत.
एस्.टी. महामंडळाच्या पुणे विभागातील ६१४ बसगाड्या रहित !
मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलनाचा परिणाम
पुणे – येथे बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवडमधून राज्यभर जाणार्या बसगाड्यांमध्ये निम्म्याने घट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून प्रतिदिन १ सहस्र २२९ बसगाड्या सोडल्या जातात. त्यातील १ नोव्हेंबर या दिवशी ६१४ बसगाड्या रहित कराव्या लागल्या. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात (कान्हादेशात) जाणार्या बसगाड्या रहित केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एकाच दिवसात महामंडळाची ३३ लाख २७ सहस्र रुपयांपर्यंत हानी झाल्याचे महामंडळाने कळवले आहे. विभाग नियंत्रक कैलास पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या सूचनेनुसार बसगाड्या पाठवल्या जात नाहीत. त्यामुळे निम्म्याहून अधिक बसगाड्या रहित करण्यात आल्या आहेत.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे नाट्यसंमेलन स्वागताध्यक्ष सुधीर गाडगीळ यांचे त्यागपत्र !
- नाट्यसंमेलन पुन्हा एकदा लांबणीवर !
- मराठा आरक्षणाला पाठिंबा !
सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा फटका ५ नोव्हेंबर या दिवशी सांगली येथे होणार्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला बसला आहे. या आंदोलनामुळे संमेलनाच्या मुहूर्तमेढीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे, तसेच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष सुधीर गाडगीळ यांनी आंदोलनामुळे त्यागपत्र दिले आहे. त्यामुळे नाट्यसंमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचे त्यागपत्र देत असल्याचे घोषित केले आहे. याविषयी बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाला यापूर्वीच आम्ही पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत नाही.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा येथे अधिवक्त्यांची दुचाकी फेरी !
सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात उत्स्फूर्तपणे दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीत ५०० हून अधिक अधिवक्ते सहभागी झाले होते. वाहन फेरीला १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारातून प्रारंभ झाला. फेरी शिवतीर्थावर आल्यावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजपथावरून फेरी गोलबागेला वळसा घालून मोती चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात आली. या वेळी शिष्टमंडळाने ‘मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समिती’च्या पदाधिकार्यांची भेट घेतली. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ‘सातारा जिल्हा बारा असोसिएशन आपल्या पाठीमागे ठामपणे उभी आहे’, असे आश्वासन सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने समन्वय समितीच्या पदाधिकार्यांना देण्यात आले.
खामगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे मराठा आरक्षणासाठी १० तरुणांनी धरणात उड्या मारून केले आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगाव येथील १० मराठा तरुणांनी खारी खामगाव येथील धरणात उड्या मारून अडीच घंटे पाण्यात राहून आंदोलन केले. ‘एक मराठा लाख मराठा, लडेंगे या मरेगे हम सब जरांगे’ अशा घोषणा देत, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. या वेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तरुणांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.
चापानेर येथे सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा !
मराठा आरक्षणासाठी चापानेर येथे गेल्या ८ दिवसांपासून बसस्थानकावर साखळी उपोषण चालू आहे. १ नोव्हेंबर या दिवशी सरकारच्या निषेधार्थ चापानेरसह सर्कलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी चापानेर, जळगाव घाट, चिंचखेडा, हसनखेडा, जवळी, आठेगाव, खेडा, गुदमा या गावांतील मराठा बांधव सहस्रोंच्या संख्येने सहभागी झाले होते.