भारतीय संस्कृतीतील पुष्पपूजन आणि अद्वितीय सजावट !
‘कुणीतरी जपानी पुष्परचनेविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समोर प्रशंसोद्गार काढून ‘आपला भारत याविषयी मागासलेला अथवा अनभिज्ञ कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला.
याविषयी परिपूर्ण आणि सडेतोड उत्तर देत प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत.
१. भारतीय संस्कृतीतील ६४ कलांमध्ये एक पुष्पकला
‘‘आपण म्हणता भारत अध्यात्मवादी. त्यामुळे अरसिक, अडाणी, इथे म्हणे सौंदर्यदृष्टीच नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत फुलांविषयी खरोखर काय लिहिलेले आहे ? ६४ कला आहेत ना ! त्यातील एक कला पुष्पमाला गुंफणे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण या सगळ्यांमध्ये पुष्पस्तरण, पुष्पशय्या, पुष्पप्रसाधन, पुष्पसजावट यांचे उल्लेख आहेत. ‘शय्यास्तरण’ आणि ‘संयोगपुष्पादिग्रंथन’ यांचे वर्णन भरताच्या ‘नाट्यशास्त्रा’त आहे, तसेच कौटिल्याचे अर्थशास्त्र, वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’ आणि भागवत यांमध्येही आहे. जुन्या धर्मग्रंथात पुष्पबंधाची वर्णने आहेत, म्हणजे फुले, पाने, छोट्या डहाळ्या, फळे आदींची पुष्प आणि पत्री गुंफून केलेली आकर्षक मांडणी आपल्या सर्व धार्मिक साहित्यात ग्रीष्मातील कोमल शिरीषपुष्प, शरद ऋतूतील नीलोत्पल, चंदनवृक्ष, अशोक पल्लव, पानाफुलांची तोरणे, फुलांचे गालिचे, ऋतुकालोद्भव फुलांची लोभस वर्णने नाहीत का ? कुठले तरी धार्मिक कार्य आम्रपल्लवांची तोरणे, त्यात गुंफलेल्या सुंदर झेंडूच्या फुलांविना पार पडते का ?
२. देवाच्या पुष्पशृंगारातील काही नियम
भक्त आणि फुले यांचे मोठे गोड नाते आहे. भक्त विलक्षण संवेदनशील असतो. फुलात त्याला परमात्मा दिसतो. अत्यंत हळूवार अशी त्याची भावना असते. देवाच्या पुष्पशृंगारात भक्तालाच प्रवेश असतो; कारण त्यासाठी काही नियम पाळावे लागतात. काही गोष्टी शिकाव्या लागतात, काही तंत्रे सांभाळावी लागतात. भक्तीचे तंत्र आणि त्याचे काही नियम आहेत. ते पुढीलप्रमाणे –
अ. अंघोळ केल्याविना पुष्पांना स्पर्श करता येत नाही.
आ. फुले आणायची ती हलक्या हाताने आणि वृक्षाला न दुखवता !
इ. फुले नखांनी खुडायची नाहीत.
ई. शिळी आणि खाली (भूमीवर) पडलेली फुले पूजेला चालत नाहीत.
उ. फुले जमा झाल्यावर शृंगार करणारे भक्त स्नान करून येतात.
ऊ. फुलांचा शृंगार करतांना कुणीही अंग खाजवायचे नाही, डोळे आणि नाक पुसायचे नाही.
ए. हाराचा दोरा तोंडात धरून दाताने तोडायचा नाही.
ऐ. सुईमध्ये दोरा ओवतांना तोंडात धरायचा नाही, असा ओंगळपणा चालत नाही; कारण तो देवाचा शृंगार आहे.
३. देवतांची प्रिय फुले अन् त्यांद्वारे करावयाचे लक्षार्चन
प्रत्येक देवाची फुले वेगळी असतात. जसे की, लक्ष्मी-विष्णु, राधा-कृष्ण, राम-सीता यांना मोगरा, जाई, जुई, चमेली, कुंद, निशिगंध अशी फुले प्रिय आहेत. गुलाब हे देशी फुल नसून ते विदेशातून आलेले आहे. गणपति आणि देवी यांना तांबडा रंग प्रिय आहे. शंकराला पांढरा रंग प्रिय आहे.
फुलांनी लक्षार्चन करायचीही भारतीय परंपरा आहे. गणपतीला दुर्वांनी, विष्णूला तुळशीने, तर शंकराला बिल्वपत्राने लक्षार्चन करतात. देवतांच्या सहस्रनामावलीचा पाठ करतांनाही त्या देवतांच्या प्रिय फुलांनी सहस्रार्चन होते. भक्तांनी फुले आणली की, ती पाण्यात हलकेच धुतात, परडीत निथळत ठेवतात आणि नंतर मऊ रेशमी फडक्याने हलकेच पुसतात.
४. विविध मंदिरांमध्ये करण्यात येत असलेले फुलांचे वेगवेगळे उत्सव
अ. श्रावणामध्ये बांबूच्या मोठमोठ्या परड्यांवर फुलांनी रांगोळी काढतात. तिला म्हणतात भराडी गौर ! शंकराच्या देवळात या गौराई बसतात.
आ. कृष्ण जन्माष्टमी नंतर ठिकठिकाणी बाळकृष्णाचा ‘डोलोत्सव’ चालू होतो. भगवंत झोपाळ्यावर बसून झोके घेतात; पण कन्हैय्याच्या भोवती फुले, पाने आणि फळे यांची सजावट जितकी करू तितकी कमीच वाटते ! कधी केवळ केळीच्या पानांनी केलेली हिरवीगार सजावट, कधी रंगीबेरंगी नाजूक आणि मोठमोठ्या फुलांनी केलेली सजावट, कधी केवळ फळांनी केलेली सजावट (अगदी लिंबापासून ते कलिंगडापर्यंत), तर कधी भाज्यांनी केलेली सजावट ! असा हा उत्सव आठवडाभर चालतो आणि बाळकृष्ण सजवलेल्या झुल्यावर या सजावटीच्या मध्यभागी स्थानापन्न होऊन त्या सजावटीला दैवी रंग चढवत असतो. वृंदावनात डोलोत्सवाच्या वेळी आजूबाजूच्या गावातून ट्रक भरून फुले येतात. पूर्ण मंदिरच फुलांनी सजते आणि मुरली मनोहरही आपल्या विविध रूपांत फुलांनी शृंगारला जातो.
इ. दक्षिणेतील शिव मंदिरात चातुर्मासाच्या कालावधीत प्रतिदिन नव्या पानाफुलांचा मोहक शृंगार असतो. शिवरात्रीला शिवाच्या भोवती केळीच्या खांबाच्या दीपमाळा असतात. केळीचे खांब सोलून त्याच्या पांढर्या शुभ्र गाभ्याला दीपमाळेचा आकार देतात. संगमरवरासारख्या दिसणार्या शिवाच्या मंडपात सभोवती या शुभ्र दीपमाळा कर्पूरगौर शिवमूर्तीचे अद्भुत दर्शन घडवतात. शिवपिंडीच्या भोवती बेल, धोतरा, कन्हेरी, अनंत या फुलांच्या रंगीबेरंगी माळा लावतात. पुष्पांच्या राशी त्या शिवाला सजवतात.
कुठे या भक्त भगवंताच्या मनातील अपूर्व अद्भुत रसमय लीला आणि कुठे त्या जपानी निर्जीव पुष्परचना !’’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३)
देवाची सजावट झाल्यावर भक्ताने भगवंताला केलेले आर्त आत्मनिवेदन !देवाची सजावट झाल्यावर भक्त भगवंताला म्हणतो, ‘‘भगवंता मी छोटा, क्षुद्र आणि तू विराट ! मला तर विराट होता येत नाही. मग तू माझ्याकरता छोटा हो, या मूर्तीत ये. मग मी मन भरून तुझा शृंगार करीन. भगवंता तसेच झाले. तू माझ्यासाठी छोटा झालास आणि तुझा मन भरून शृंगारही झाला; पण हे कसे रे भगवंता ! झाले उलटेच. फुलापानांनी तुझी शोभा करणे चालू होते; पण झाले वेगळेच. या फुलापानांची, फळांचीच तुझ्या सान्निध्यामुळे अपूर्व शोभा वाढली आहे !’’ (साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३) |