पाकला अफगाणी परके !
इस्लामी देशांनी ते संघटित असल्याच्या कितीही वल्गना केल्या, तरी ‘प्रत्यक्षात वस्तूस्थिती वेगळी आहे’, हे कट्टर इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानच्या एका निर्णयावरून दिसून आले. पाकिस्तान सरकारने पाकमधून १० लाख अफगाणी आश्रितांना हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही देशाला स्वतःच्या अडचणीच्या काळात अन्य देशांतील स्वधर्मीयही परके वाटू लागतात. ते त्यांना त्यांच्या देशात नको असतात. याच भूमिकेतून पाकने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. एरव्ही जो पाकिस्तान भारतातील मुसलमानांवर कथित अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटतो, आज तोच पाकिस्तान १० लाख आश्रित मुसलमानांना हाकलून देऊन त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याविषयी इस्लामी देशांची संघटना असलेल्या ‘ओ.आय.सी.’ने पाकिस्तानला खडसावले पाहिजे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा म्यानमारमधून सहस्रो रोहिंग्या मुसलमान भारतात घुसले होते आणि भारत त्यांना परत पाठवू इच्छित होता, तेव्हा याच पाकने त्यात खोडा घालत भारताला ‘मानवताविरोधी’ ठरवले होते. मग आता अफगाणी आश्रितांच्या संदर्भात पाकची मानवता कुठे गेली ? पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड करण्याचे काम ‘फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’ या विदेशात रहाणार्या भारतियांच्या एका संघटनेने केले. या संघटनेने थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून पाकला अफगाणी आश्रितांची हकालपट्टी करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे, तर या संघटनेने ‘पाकिस्तान अफगाणी आश्रितांसमवेत तेच करत आहे, जे त्याने वर्ष १९४७ मध्ये अल्पसंख्यांक हिंदू आणि शीख नागरिक यांच्यासमवेत केले. अफगाणी आश्रितांना त्रास देऊन त्यांना पळवून लावून पाकिस्तानला त्यांची संपत्ती बळकवायची आहे’, हेही निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता भारतासह अन्य देशांनीही पाकची अमानवता आणि दुटप्पीपणा यांविरोधात संयुक्त राष्ट्रांत आवाज उठवला पाहिजे. या सर्वांमध्ये अफगाणी आश्रितांची अवस्था मात्र ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. त्यांना तालिबानी राजवटीत जाण्याची इच्छा नाही, तर पाक त्यांना त्याच्या देशात राहू देत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. अफगाणी आश्रितांची ही अवस्था पाहिल्यानंतर ‘कठीण समय येता, कोण कामास येतो ?’, या उक्तीची प्रचीती येते !
भारताला घुसखोर रोहिंग्यांना परत पाठवण्यास विरोध करणारा पाक स्वतः मात्र अफगाण आश्रितांची हकालपट्टी करतो, हे लक्षात घ्या ! |