परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ईश्वरी अभिजित कुलकर्णी (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ईश्वरी अभिजित कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. ईश्वरी अभिजित कुलकर्णी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.८.२०२३) |
‘आम्ही पुण्यात रहात असतांना ईश्वरीमध्ये साधना किंवा सेवा यांविषयी जी तळमळ होती, ती तळमळ आम्ही अमेरिकेत गेल्यावरही केवळ गुरुकृपेनेच टिकून राहिली आहे. मला, माझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला जाणवलेली ईश्वरीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. गौरी कुलकर्णी (ईश्वरीची आई), मिनियापोलिस, अमेरिका.
‘वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू होती. तेव्हा मी सनातन संस्थेच्या वतीने घेतले जाणारे ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग घेत होते आणि माझे यजमान श्री. अभिजित कुलकर्णी बालसंस्कारवर्गाचे चित्रीकरण करण्याची सेवा करत असत.
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवेसाठी साहाय्य करायला सांगितले आहे’, या भावाने सेवेसाठी साहाय्य करणे : एकदा मी तिला सांगितले, ‘‘बालसंस्कारवर्ग घेण्याच्या या सेवेत जो साहाय्य करील, त्याच्यावर देवाची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा होणार आहे.’’ तेव्हापासून ‘प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) या सेवेत साहाय्य करायला सांगितले आहे’, या भावाने ती मनापासून साहाय्य करण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या आत्याने (सौ. साक्षी नागेश जोशी हिने) तिला भ्रमणभाषवर विचारले, ‘‘तू सेवेत साहाय्य करतेस ना ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘हो. परम पूज्यांनी सेवेत साहाय्य करायला सांगितले आहे ना ?’’
१ आ. बालसंस्कारवर्गाचे चित्रीकरण करतांना कु. ईश्वरीने केलेले साहाय्य !
१ आ १. बालसंस्कारवर्गाचे चित्रीकरण चालू असतांना ‘स्वतःकडून आवाज होणार नाही’, याची काळजी घेणे : बालसंस्कारवर्गाच्या चित्रीकरणाची सेवा काही दिवस रात्री उशिरापर्यंत चालत असे. तेव्हा ईश्वरी ‘तिच्याकडून आवाज होणार नाही’, याची काळजी घेत असे. ती आमच्या समवेत रात्री उशिरापर्यंत जागीही रहायची.
१ आ २. बालसंस्कारवर्गाचे चित्रीकरण करतांना तिला शक्य असलेल्या सर्व सेवा करणे : ती तिच्या बाबांना चित्रीकरणाची सिद्धता करायला साहाय्य करत असे, उदा. मी बालसंस्कारवर्ग घ्यायला बसत असे, तिथे खाली चादर घालणे, मला चित्रीकरणासाठी सिद्ध होण्यास साहाय्य करणे, आम्हा दोघांना प्यायला पाणी आणून देणे, कधी कधी त्या खोलीचा केर काढणे, गोमूत्र शिंपडणे, उदबत्ती लावणे, खोकी लावणे, भ्रमणसंगणक चालू करून ठेवणे इत्यादी सेवा ती करत असे.
१ आ ३. चित्रीकरणाच्या वेळी अडचणी आल्यावर सतर्कतेने आध्यात्मिक उपाय करणारी ईश्वरी ! : एक दिवस चित्रीकरण करतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. त्यामुळे माझ्या मनात प्रतिक्रिया येऊन माझी फार चिडचिड होत होती. तेव्हा ईश्वरीने स्वतःहून आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले.
अ. ईश्वरीने ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समोर आणून ठेवला.
आ. तिने तिच्या वडिलांकडे विभूती फुंकरण्यासाठी आणून दिली.
इ. दुसर्या दिवशी तिने स्वतःहून आम्ही दोघे आणि सर्व उपकरणे यांच्याभोवती कापराचे मंडल घातले.
ई. चित्रीकरण करतांना ती तिथे नामजप करत बसली. एरव्ही ती चित्रीकरण चालू असतांना काहीतरी लिहिते किंवा चित्रे काढते; मात्र त्या दिवशी तिने शांतपणे बसून नामजप केला.
१ इ. आश्रमजीवनाशी सहजतेने एकरूप होणे : मार्च २०२२ मध्ये आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात काही दिवसांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘ईश्वरी आश्रमात नीट राहू शकेल का ? तिला घेऊन मला अन्य सेवा करता येतील का ?’, असे मला वाटत होते; पण प्रत्यक्षात ती एकदम सहजतेने आश्रमजीवनाशी एकरूप झाली. ती सर्व साधकांशी सहजतेने बोलत असे. मी फलकावर चूक लिहीत असतांना तीही तिच्याकडून झालेली चूक फलकावर लिहीत असे. तिने तिचे स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची सूची केली. ती सत्संग आणि सेवा यांच्या वेळा पाळत असे. ती नियमितपणे दैनंदिनी आणि सारणी लिखाण (टीप) करण्याचा प्रयत्न करत असे.
टीप : प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती किंवा विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती किंवा विचार लिहिणे
१ ई. वडील कार्यालयीन कामासाठी अमेरिकेला गेल्यावर समजूतदारपणे वागणारी ईश्वरी ! : माझे यजमान श्री. अभिजित कुलकर्णी यांना कार्यालयीन कामानिमित्त एप्रिल २०२२ मध्ये अमेरिका येथे जावे लागले. तेव्हा एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत पुण्यात आम्ही दोघीच (मी आणि ईश्वरी) घरी होतो. तेव्हा ईश्वरी समजूतदारपणे लवकर उठून शाळेत जाण्यासाठी आवरत असे, तसेच मला कुठे सेवेसाठी जायचे असल्यास ती स्वतःहून माझ्या समवेत येत असे. कधी कधी वडिलांची आठवण येऊन तिला रडूही यायचे; पण समजावल्यावर ती शांत होत असे.
१ उ. सेवेची ओढ : ती मला म्हणायची, ‘‘माझी शाळा सुटल्यावर आपण पुणे येथील सेवाकेंद्रात जाऊन सेवा करूया. मलाही प्रतिदिन सेवा करायची आहे.’’ वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी ती माझ्या समवेत सेवा करायला येत असे आणि तिला शक्य होतील, त्या छोट्या छोट्या सेवा करत असे.
१ ऊ. शांत राहून परिस्थिती स्वीकारणे : माझ्या यजमानांचे अमेरिकेतील वास्तव्य वाढल्याने आम्हा दोघींचेही तिकडे जायचे ठरले. तेव्हा तिने मला प्रवासाची सिद्धता करण्यास साहाय्य केले. हा विमानप्रवास एकूण २२ घंट्यांचा होता. या प्रवासात आमच्याकडे बरेच साहित्य होते. भारतातून निघतांना आमचे विमान उशिरा सुटल्याने आमचे पुढील विमान चुकले; पण या परिस्थितीत ईश्वरीने काहीही त्रास दिला नाही.
१ ए. अमेरिका येथे आल्यावर जाणवलेली ईश्वरीची वैशिष्ट्ये !
१ ए १. कुंकू लावून आणि केस बांधून शाळेत जाणे : ‘अमेरिकेत केशभूषा, वेशभूषा हे सर्व वेगळे असूनही ईश्वरी प्रतिदिन केस बांधून आणि कपाळावर टिकली लावून शाळेत जाते.
१ ए २. शाळेत जुळवून घेऊन मैत्री करणे : ईश्वरी पुणे येथे मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. त्यामुळे ‘ती इकडे कसे जुळवून घेईल ?’, अशी मला काळजी वाटत होती; परंतु येथील शाळा, भाषा आणि शिक्षक सर्व वेगळे असूनही तिने ती परिस्थिती अगदी सहजतेनेे स्वीकारली. देवाच्या कृपेने तिच्या वर्गात काही भारतीय मुली असल्याने तिला त्यांचे साहाय्य झाले. अल्पावधीत तिला शाळेत चांगल्या मित्र-मैत्रिणी मिळाल्या. तिने तिच्या शिक्षकांचेही मन जिंकले. शिक्षकांना तिच्याविषयी काही विचारल्यास ते तिचे कौतुक करतात.
१ ए ३. इंग्रतीतून संवाद करायला आवडत नसल्यामुळे मराठीतूनच बोलणे : आता तिला थोडे थोडे इंग्रजी बोलता येते. ‘तिला इंग्रजी भाषेत अजून चांगले बोलता यावे’, यासाठी मी तिला ‘एरव्हीही तू इंग्रजीमध्ये बोलत जा’, असे सांगितले आहे, तरी ती मराठीतूनच बोलते. तिला इंग्रजीमध्ये बोलायला फारसेे आवडत नाही.
१ ए ४. अमेरिकेतील रज-तम वातावरणामुळे होणारे परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न ! : अमेरिकेतील शाळेत पुष्कळ रज-तम आहे, उदा. मुलांचे कपडे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, विचित्र नृत्य करणे इत्यादी. त्यामुळे अनेक वेळा शाळेतून घरी आल्यावर ईश्वरीची चिडचिड होतेे. काही वेळा ती उलट बोलते, रुसते किंवा अनावश्यक वेळ वाया घालवते; पण नामजपादी उपाय केल्यावर तिचे वागणे पालटते. कधी कधी ती शाळेतून आल्यावर स्वतःहून नामजप करते, तर कधी तिला त्याची जाणीव करून दिल्यावर करते.
१ ऐ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
१ ऐ १. ती प्रतिदिन वहीत नामजप लिहिते आणि ‘माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा कुणाला देऊ ?’, असे मला विचारते.
१ ऐ २. चुकांविषयी संवेदनशीलता : एकदा ती शाळेतून घरी आल्यावर मी तिला काहीतरी सांगितले. तेव्हा तिने मला उलट उत्तर दिले. तिला त्याची जाणीव करून दिल्यावर ती खोलीत गेली आणि तिने गळ्यात घालण्यासाठी एक पाटी केली. त्यावर तिने लिहिले होते, ‘आईला उलट बोलल्यावर पाप लागते.’ तिने ती पाटी गळ्यात घातली. तिच्याकडून चूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यावर ती लगेच क्षमायाचनाही करते.
१ ऐ ३. सत्संगात सांगितल्यानुसार साधनेचे प्रयत्न करणे : अमेरिकेला गेल्यावरही आम्ही पू. (सौ.) मनीषा पाठक घेत असलेला ‘गुरुलीला’ सत्संग ऐकत होतो. त्यात व्यष्टी साधनेसाठी करायला सांगितलेले प्रयत्न ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. सत्संगात सांगितल्याप्रमाणे तिने व्यष्टी साधनेचे नियोजन करून ते घरातील सर्व खोल्यांमध्ये लावले होते. एकदा ‘आमचे (घरातील सर्वांचे) व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, असे लक्षात आल्यावर तिने घरातील सर्वांसाठी फलकावर ‘व्यष्टी साधनेची सूत्रे आणि त्याचा आढावा’, अशी सारणी सिद्ध केली.
१ ओ. अनुसंधानात असणे : एक दिवस तिने फलकावर एक चित्र काढले होते. या चित्राविषयी तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘हा औदुंबर वृक्ष असून त्यामध्ये निळ्या रंगाचा गोल म्हणजे दत्तगुरु आहेत. बाजूने दत्त लिहिलेले गोल म्हणजे दत्तगुरूंचे भक्त आहेत.’’ त्या चित्राकडे पाहून दत्ततत्त्व जाणवत होते. त्या वेळी ‘तिचे आतून देवाशी अनुसंधान असते’, असे मला जाणवले.
१ औ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव !
१ औ १. ‘साधना नीट होत नाही आणि त्यामुळे गुरुदेवांना त्रास होतो’, याची खंत वाटून रडणारी ईश्वरी ! : एकदा ती मोठ्याने रडत श्रीकृष्णाचा नामजप करत होती. तिला रडण्याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) सत्संगात नेहमी सांगतात, ‘आपण व्यष्टी साधना नीट करत नाही; म्हणून प.पू. गुरुदेवांना त्रास होतो. ते प्रतिदिन इथे येऊन आपले त्रासदायक शक्तीचे आवरण घेऊन जातात.’ माझ्यामुळे त्यांना पुष्कळ त्रास होतो. आता मी नियमित नामजप करणार. मी त्यांना त्रास देणार नाही.’’ तेव्हा तिच्या बोलण्यात पुष्कळ खंत आणि आर्तता जाणवत होती.
१ औ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्यासाठी जाता न आल्यामुळे वाईट वाटणारी ईश्वरी ! : ‘या वेळी गुरुदेवांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा साधकांना प्रत्यक्ष पहाता येणार आहे’, असे कळल्यावर ती जाण्याचा हट्ट करू लागली; परंतु तेव्हा काही कारणाने आम्हाला भारतात येणे शक्य झाले नाही; म्हणून आम्ही ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा ‘ऑनलाईन’ पाहिला. त्याच्या दुसर्या दिवशी ती पुन्हा ‘मला गुरुदेवांना भेटायचे आहे’, म्हणून रडू लागली. तिला समजावून सांगितल्यावर ती शांत झाली.
१ क. ईश्वरीमध्ये जाणवलेला पालट !
१ क १. आत्मविश्वास वाढणे : अमेरिकेत आल्यापासून ‘ईश्वरीचा आत्मविश्वास वाढला आहे’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने शाळेतील विविध उपक्रमांत ती स्वतःहून भाग घेते. तिच्या शाळेमध्ये ‘पोस्टर’ काढण्याची स्पर्धा झाली. गुरुदेवांच्या कृपेने ३९२ विद्यार्थ्यांमध्ये तिचा दुसरा क्रमांक आला !
१ ख. स्वभावदोष : उतावळेपणा, उद्धटपणा, राग येणे, वाईट वाटणे आणि सातत्याचा अभाव.
१ ग. कृतज्ञता : ‘हे गुरुदेवा, ईश्वरीमध्ये जे दैवी गुण आणि चांगले संस्कार आहेत, ते सर्व आपलेच आहेत. हे परब्रह्मस्वरूप गुरुमाऊली, केवळ आपली अपार कृपा, म्हणून आम्हाला (मला आणि यजमानांना) या दैवी बालिकेचा सांभाळ करण्याची सेवा मिळाली आहे; पण या सेवेत आम्ही पुष्कळ अल्प पडतो. हे गुरुदेवा, आपणच तिला आणि आम्हाला क्षणोक्षणी सांभाळत आहात’, यासाठी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
२. श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आजोबा (आईचे वडील), आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा कुलकर्णी (आजी (आईची आई), आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७३ वर्षे), सांगली
२ अ. कामाची आवड : ‘ईश्वरीला काम करण्याची आवड असून ती प्रत्येक काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते. ती आईला तिच्या सेवेत साहाय्य करते.
२ आ. साधनेची आवड : तिला तिच्या आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच साधनेची आवड निर्माण झाली. प्रत्येक सण आध्यात्मिकदृष्ट्या साजरा करण्यासाठी ती आईला साहाय्य करते.’
३. सौ. कविता बेलसरे (ईश्वरीची मावशी), पुणे
३ अ. प्रेमळ आणि आनंदी असणे : ‘ईश्वरी सर्वांशी सहजतेने वागते आणि बोलते. तिचे बोलणे पुष्कळ प्रेमळ आणि आत्मीयतेचे वाटते. ती कुठेही गेली, तरी आनंदी असते.
३ आ. परिस्थितीशी जुळवून घेणे : सध्या ती अमेरिकेत रहात आहे. भारतात असतांना ती जशी सहज वागते, तशीच ती विदेशातील वातावरण आणि व्यक्ती यांच्याशीही जुळवून घेऊन सहजतेने वागते.
३ इ. सर्व वयाच्या व्यक्तींशी जवळीक साधणे : ती सर्वच वयाच्या व्यक्तींशी जवळीक साधते. प्रत्येकाच्या प्रकृतीशी जुळवून घेणे तिला लगेच जमते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३.५.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |