इस्रायल नष्ट होईपर्यंत पुनःपुन्हा आक्रमण करण्याची हमासची दर्पोक्ती !

हमासचा राजकीय विभागाचा सदस्य आणि प्रवक्ता गाझी हामद

बेरूट (लेबनॉन) – आम्हाला इस्रायलला धडा शिकवायचा आहे. आम्ही ७ ऑक्टोबरसारखे आक्रमण सतत करत राहू. २,३,४ वेळ तरी आम्ही असे आक्रमण करू. इस्रायलचे अस्तित्वच अनावश्यक आहे आणि आम्ही पॅलेस्टाईनमध्ये राहून त्याला संपवू, असे विधान हमासचा राजकीय विभागाचा सदस्य आणि प्रवक्ता गाझी हामद याने लेबनॉनमधील ‘एलबीसी-२४’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

१. हामद पुढे म्हणाला की, इस्रायल अस्तित्वात असणे; म्हणजे अरब आणि इस्लामी देशांची सुरक्षा आणि सैन्य धोक्यात असण्यासारखे आहे. ‘या युद्धाची किंमत आपल्याला चुकवावीच लागेल’, असे सांगायला आम्हाला कोणतीही लाज वाटत नाही. आम्ही यासाठी सिद्ध आहोत. पॅलेस्टाईनला ‘हुतात्म्यांचा देश’ म्हटले जाते आणि आम्हाला हुतात्म्यांवर गर्व आहे. गेल्या ७५ वर्षांपासून आम्ही इस्रायलच्या नियंत्रणातील पीडित आहोत. यामुळेच आम्ही जे काही केले, त्यासाठी आम्हाला आरोपी बनवता येणार नाही. ७ आणि १० ऑक्टोबरला किंवा अन्य कोणत्याही दिवशी जे काही आम्ही केले, ते सर्व योग्यच आहे. हमासचा उद्देश सामान्य नागरिकाला हानी पोचवण्याचा कधीही नाही.

२. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हमासच्या या विधानाची निंदा केली आहे. तसेच अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनीही ‘आतंकवादी स्वतःच सांगत आहेत की, ते काय आहेत आणि काय करू इच्छित आहेत. यामुळेच जोपर्यंत हमास नष्ट होत नाही, तोपर्यंत युद्धविराम होऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

३. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवरली यांनी ट्वीट करून म्हटले की, हमास इस्रायलला उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे, तर आम्हाला शांतता कशी मिळू शकते ? हमास ७ ऑक्टोबरसारखे दुसरे आक्रमण करण्याच्या गोष्टी करत आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवादी संघटना हमासचे हे विचार पहाता हमासलाच नष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे, यात शंका नाही !