श्रीराममंदिराच्या गर्भगृहात ३ फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार ५१ इंचाचे श्रीरामलला !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे; मात्र त्यापूर्वी मंदिराच्या गर्भगृहात १५ डिसेंबरपर्यंत ३ फूट उंच सुवर्ण सिंहासन स्थापित होणार आहे. त्यावर ५१ इंच उंच श्रीरामललाची मूर्ती बसवली जाणार आहे. ही मूर्ती कमळावर विराजमान होईल.
१. वास्तूविशारद सी.बी. सोमपुरा यांच्या रचनेच्या आधारे राजस्थानचे कारागीर सिंहासन बनवत आहेत. यावर सोन्याचा मुलामा चढवलेला असेल. संपूर्ण गर्भगृह अत्यंत उच्च गुणवत्तेच्या पांढर्या मकराना मार्बलपासून बनवले जात आहे.
२. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले की, ४४० चौरस फुटांचे गर्भगृह उभारले आहे. १६ फुटांपेक्षा अधिक उंच गर्भगृहात १५ सहस्र चौरस फूट नक्षीकाम असलेले मार्बल लावलेले आहे. परिक्रमा पथ बांधून पूर्ण झाला आहे. तसेच मंदिराचा तळमजला १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. पहिल्या मजल्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.