अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

  • देहलीमध्ये घडली मानवतेला काळीमा फासणारी घटना !

  • चोरट्यांनी पळवला भ्रमणभाष आणि लॅपटॉप

  • लोक अपघाताचा बनवत होते व्हिडिओ

अपघातग्रस्त तरुण पियुष पाल

नवी देहली – येथे अपघातात घायाळ झालेल्या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुण साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या तरुणाचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप चोरट्यांनी या काळात पळवला. पियुष पाल (वय ३० वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेवरून संताप व्यक्त होत आहे.

पियुष नेहमीप्रमाणे रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास आउटर रिंग रोडने मोटारसायकलवरून जात होता. अचानक त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर तो रस्त्यावर साहाय्यासाठी याचना करत होता. या वेळी चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष चोरला. त्या वेळी या भ्रमणभाषवर त्याच्या पालकांचा फोन आला असता चोरट्यांनी तो कट केला आणि नंतर फोन बंद केला. अपघात पियुषच्या घराजवळच झाला होता. त्यामुळे त्याचा फोन उचलून घरच्यांना याविषयी माहिती मिळाली असती, तरी त्याचा जीव वाचला असता. पंकज जैन नावाच्या एका तरुणाने पियुषला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत पियुषचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

  • भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
  • पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !