‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून पुणे विद्यापिठात विद्यार्थ्‍यांना मारहाण !

अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनाही मारहाण करण्‍याचा प्रयत्न !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये ‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’, लोकायत अशा विविध संघटना १ नोव्‍हेंबर या दिवशी विद्यार्थ्‍यांची बळजोरीने सदस्‍यता नोंदणी करत होत्‍या. या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या मारहाणीमध्‍ये विद्यार्थी जबर जखमी झाले असून एका विद्यार्थ्‍याच्‍या कपाळावर मोठी जखम झाली आहे. यानंतर अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनी मध्‍यस्‍थी करून पोलिसांना संपर्क केला आणि पीडित विद्यार्थ्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात नेले. मध्‍यस्‍थी करत असतांना अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनाही मारहाण करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला.

अभाविपचे पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे म्‍हणाले की, डाव्‍या विचारांच्‍या संघटना अशा प्रकारे विद्यापिठांमध्‍ये येऊन विद्यार्थ्‍यांवर सदस्‍यतेसाठी बळजोरी करत आहेत. त्‍यांना धमकी देत आहेत. अशा संघटनांवर आणि संबंधित दोषींवर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करावी अन् त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंद करावेत. विद्यार्थ्‍यांवर दमदाटी करायचा अधिकार कुणालाही नाही, तसे होत असल्‍यास अभाविप सामान्‍य विद्यार्थ्‍यांसह कायम उभी असेल.