हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !
काठमांडू (नेपाळ) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
या काळात ‘हिंदु विद्यापीठ, नेपाळ’चे श्री. भोलानाथ योगी; ‘श्री कालीगंडकी ज्ञान विज्ञान प्रतिष्ठान’चे श्री. चैतन्य कृष्ण; ‘विश्व हिंदु महासंघ, नेपाळ’चे सहअध्यक्ष श्री. शंकर खराल, अधिवक्ता बेन बहादुर पौडेल, ‘त्रिचंद्र विश्वविद्यालया’चे प्राध्यापक डॉ. गोविंद शरण, ‘त्रिभुवन विश्वविद्यालया’चे प्राध्यापक निरंजन ओझा, ‘आदित्य वाहिनी’चे श्री. दर्शन पनेरू, ‘नेपाळी सेना स्वास्थ्य विज्ञान संस्थान’च्या ‘फार्माकलॉजी विभागा’चे प्रमुख डॉ. सम्मोदाचार्य कौडिण्य, ‘लिडरशिप अकादमी’चे श्री. संतोष शहा, ‘नेपालका लागी नेपालीज पक्षा’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष पटेल, ‘शिवसेना नेपाळ’चे श्री. त्रिलोक श्रेष्ठ, ‘लोकतांत्रिक समाजवादी पक्षा’चे श्री. मनिष मिश्रा, ‘नेपाळ ज्योतिष परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष ज्योतिषाचार्य श्री. लोकराज पौडेल, ज्योतिषाचार्य श्री. लक्ष्मण पंथी, ‘विश्व हिंदु युवा विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष श्री. महेंद्र जंगसहा, ऋषिकेश जंगसहा, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रेम कैदी आदी विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या.
१. ‘स्वधर्म टिव्ही’ यू ट्यूब वाहिनीचे सुवास आगम यांच्याशी संवाद
‘स्वधर्म टिव्ही’ या यू ट्यूब वाहिनीचे श्री. सुवास आगम यांनी सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप केला. श्री. आगम यांनी समाजमनातील अध्यात्माविषयीच्या शंका जिज्ञासेने विचारल्या आणि त्यांची सद़्गुरु डॉ. पिंगळे यांनी उत्तरे दिली.
२. काठमांडू विश्वविद्यालयाच्या चिकित्सा विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
काठमांडू विश्वविद्यालयामध्ये ‘योगिक सायन्स’ हा नवीन अभ्यासक्रम चालू करण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. अनंत रिजाल यांच्या विनंतीवरून सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी विश्वविद्यालयाच्या चिकित्सा विज्ञान महाविद्यालयाला भेट दिली. या वेळी ‘बॅचलर ऑफ योगिक सायन्स’ या नूतन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सद़्गुरु डॉ. पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सद़्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘मुळात आंतरिक शाश्वत अस्तित्वाशी तुटलेला संबंध हीच समस्या आहे. अशुद्ध मन आणि अशुद्ध बुद्धी हे यांतील प्रमुख बाधा आहेत. खरेतर या अभ्यासक्रमामध्ये सुट्टी नाही, तर सतत शिकायचे असते. आंतरिक शाश्वत अस्तिवाची अनुभूती घेतल्यावरच ही यात्रा पूर्ण होते.
३. विश्व हिंदु युवा विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन
हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रेम कैदी यांनी विश्व हिंदु युवा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. महेंद्र जंगसहा आणि काही सदस्य यांच्यासाठी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी सद़्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘कार्य करण्यासाठी मन, बुद्धी आणि ज्ञान यांचे अधिष्ठान आवश्यक आहे. आपला आक्षेप आणि खंडण यांचा अभ्यास पाहिजे. ज्ञानयुक्त युवकच संघर्षासाठी सिद्ध होतो. हिंदूंचा धर्म आणि विज्ञान यांचा अभ्यास नाही. आपली परंपरा हिंदु-मुसलमान नाही, तर केवळ धर्म आणि अधर्म असे विभाजन करते. रावण ब्राह्मण होता, कंस क्षत्रिय होता आणि अश्वथामा तपस्वी होता, तरीही ते अधर्मी असल्यामुळे त्यांचा नाश झाला. अधर्माच्या पक्षात गेलात, तर दंड/विनाश निश्चित आहे, मग भलेही तुम्ही वेदांचे प्रकांड पंडित का असेना !’’
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळ दौर्यामध्ये सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शक सूत्रे :अ. धर्मरक्षणाविषयीची सूत्रे १. धर्म आचारमूलक आहे. धर्माचे रक्षण धर्माचे आचरण केल्याने होते. २. धर्म-अधर्माच्या लढ्यात सर्वप्रथम अर्जुनाप्रमाणे स्वत:शी लढावे लागते. ३. आज हिंदूंकडे संख्याबळ, ज्ञान आणि सर्व समस्यांवर उपाय आहेत, तरीही त्यांच्या समस्या सुटत नाहीत. हिंदूंचे सामर्थ्य उपासना आणि तपस्या यांमध्ये आहे. जोपर्यंत आपण कुटुंब, जातपात, समाज, प्रांत, पक्ष आदींची ओळख सोडून केवळ धर्म आणि अधर्म यांच्यापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपली समस्या सुटणार नाही. ४. जगाच्या कल्याणासाठी आपल्या ऋषिमुनींनी स्वत:ची हाडेही दिली. असे समर्पण केवळ भक्तच करू शकतो. स्वत:तील चैतन्याला जागृत करा आणि नंतर धर्माधिष्ठित कार्याचा संकल्प करा. ५. स्वधर्म जाणा. स्वबोध झाला की, शत्रूबोधाकडे जाऊ शकतो. लोक स्वधर्म न जाणताच शत्रूबोध करतात. ६. आज हिंदूंना ‘धर्मरक्षण म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नाही. (हिंदूंकडे साधनेचे बळ नाही. त्यांचे राहणीमान, वेशभूषा आदी हिंदु धर्माप्रमाणे नाहीत.) त्यामुळे ते त्यांच्या पुढील पिढीलाही ज्ञान देऊ शकत नाहीत. ७. पूर्वी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम नव्हते. ही पाश्चात्त्यांची संकल्पना आहे. हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ४ आश्रम (ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम), ४ पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) आणि सगुण-निर्गुण आहे. ८. शास्त्र गेले आणि केवळ कृती राहिली की, भेद निर्माण होतो. अज्ञान वाढले, तर संघर्ष चालू होतो. ९. सत्य बोलणे हा धर्म आहे; पण सत्याचा अहंकार हा अधर्म आहे. १०. सर्व समावेशकता हा हिंदु धर्माचा स्थायीभाव आहे. ११. धर्मपरंपरेने तत्त्व सांगितले आहे. धर्मात प्रत्येक समस्येवर उपाय आहे. आपल्याला केवळ तत्त्व ठाऊक हवे. आ. राष्ट्ररक्षणाविषयीची सूत्रे १. राष्ट्राचे संचालन भावनेने नाही, तर कूटनीतीने केले पाहिजे. २. राजाचे मुख जनतेची ओळख बनते. ३. पूर्वी काही वृत्तवाहिन्या सत्य लपवायच्या; पण आता त्या खोट्या बातम्या प्रसारित करतात. ४. मनात अशुद्धता आली की, विकृती येते. ५. सत्ता, स्वार्थ, स्त्री, अहंकार आणि धन यांची तृष्णा असेल, तर त्याच्या पूर्तीसाठी संघर्ष अन् युद्ध होणार. ६. साधना आणि तपोबल यांखेरीज राष्ट्र्रकार्य करता येत नाही. ७. ‘राजा कालस्य कारणम्’, म्हणजे राजा हा काळाला कारण बनतो. तसेच ‘यथा प्रजा तथा राजा’, म्हणजे प्रजेच्या पात्रतेप्रमाणे त्याला राजा मिळतो. प्रजा स्वार्थी आणि भ्रष्टाचारी असेल, तर तिला राजाही तसाच मिळतो. राज्यव्यवस्था धर्माला संरक्षित करणारी पाहिजे. धर्म बळाच्या अधीन असतो. व्यष्टी धर्मात असुरक्षितता आली की, व्यक्ती भ्रष्ट होतो आणि समाजव्यवस्था बिघडते. ८. धर्मपरंपरा ही देशाची ओळख असते. ९. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समान ध्येय घेऊन कार्य केले पाहिजे. भेद पाहिले, तर एकत्र केव्हाच येता येणार नाही. १०. मुळाला धरून (धर्मपरंपरेला) घेतलेले शिक्षण वाचवते, तर मुळाला सोडून घेतलेले शिक्षण विनाशाकडे नेते. ११. आपण पूजाही संकल्प करून करतो, तर सत्कार्य करतांना संकल्प करणे आवश्यक आहे. संकल्पसहित कार्य केल्याने ऊर्जा मिळते. इ. साधनेविषयीची सूत्रे १. स्वेच्छा धर्मसंमत नाही, तर तमोगुणी आहे. स्वेच्छेने वागणारा जीव, जीवात्मा हा परेच्छेने, तर शिवात्मा ईश्वरेच्छेने वागतो, तसेच शिवदशेत शून्यावस्था असते. २. भगवंताने हिंदूंच्या रक्षणाचे नाही, तर भक्तांच्या रक्षणाचे दायित्व घेतले आहे. ३. मायेचे आवरण दूर करण्यासाठी साधनेच्या ऊर्जेने प्रकाश प्रसारित केल्यानेच धर्मरक्षणाचे कार्य होते. ४. आपण कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन महत्त्वाचे आहे. ५. षड्र्िपूयुक्त उपासना, म्हणजे असुर होय. ६. अध्यात्माचा प्रवास आपल्या आवडीप्रमाणे चालू करू शकतो; पण एकदा गुरु जीवनात आले की, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे. ७. संतांचे कार्य हे समाजाला त्यांचे कष्ट दूर करुन त्यांना धर्माशी जोडून ठेवणे आहे आणि गुरूंचे कार्य हे शिष्यातील ईश्वरत्व जागृत करून त्याला मोक्षप्राप्ती करून देणे. ८. आपल्याला वाटते की, आपण चांगले की जग चांगले. ‘विकृती काय आणि धर्म काय ?’, हे श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगावे लागले. स्वकौतुकामध्ये अडकले की, पुढे काही करता येत नाही. सत्त्वगुणाच्या पुढे गुणातीत अवस्थेत जायचे आहे. अधर्मी आपला धर्म सोडत नाही, तर आपण आपला धर्म का सोडावा ? स्वतःची जागृती होणे, हा पुरुषार्थ आहे. संस्कार आणि स्वार्थ जागृत होतो, तेव्हा आपण निद्रिस्त होतो. अर्जुन साधक आणि जागृत होता, तरी त्याला गीता सांगावी लागली. ९. आत्मबल वाढले की, मनोबल वाढते. आत्मबल आणि मनोबल प्रतिकारक्षमता टिकवते. मनोबल अल्प झाले की, मनात शंका येतात आणि प्रतिकार क्षमता अल्प होते. १०. बाह्य मंदिर कितीही मोठे असले, तरी लहान बनूनच देवाला हृदयात ठेवावे लागते. बाह्य मंदिरापेक्षा प्रथम आंतरिक मंदिरात देवाला स्थापित केले पाहिजे. ई. धर्मरक्षण करणार्यांची दिनचर्या कशी असावी ? धर्मरक्षण करणार्याने उपासनेसाठी प्रतिदिन २ घंटे दिले पाहिजे. वैयक्तिक साधनेनेच स्वतःचे जीवन आणि कार्य यांसाठी आशीर्वाद मिळतात. आपण उपासना न करता केवळ कार्य करत असू, तर आपण हिंदु नाही. |