हॉटेलमध्ये अश्लील नृत्य करणार्या मुली आणि अनैतिक समाज यांविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निवाडा !
१. हॉटेलमध्ये अश्लील नृत्य करणार्या महिला आणि पुरुष यांच्यावरील गुन्हे रहित करण्यासाठी याचिका
‘नागपूर पोलिसांनी ‘टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क’ येथील बँक्वेट हॉलमध्ये धाड टाकली आणि तेथे तोकड्या कपड्यांमध्ये अर्धनग्न होऊन अश्लील नृत्य करणार्या ६ मुली अन् ६ पुरुष यांना अटक केली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करण्यात आली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ‘तोकड्या कपड्यांमध्ये हातवारे करून उत्तेजक नृत्य करणे, हे अश्लील नाही. तसेच ते अनैतिक कृत्यही समजले जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व गुन्हे रहित करावेत.’ यासमवेतच पोलिसांनी ‘महाराष्ट्र दारूबंदी कायदा’, ‘महाराष्ट्र पोलीस कायदा’ यांच्यातील लावलेली कलमे आणि भारतीय दंड विधानातील कलम २९४ ही रहित करण्यात यावे’, अशी मागणी केली.
अर्जदाराच्या याचिकेवर सरकारचे म्हणणे मागवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी म्हणणे मांडले की, आम्हाला संबंधित ठिकाणी काही महिला तोकड्या कपड्यांमध्ये उत्तेजक नृत्य करत असल्याची, तसेच पुरुष मंडळी त्यांच्यावर पैसे उधळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. तेथे धाड टाकल्यावर मद्याचे पेले आणि बाटल्या आढळून आल्या. हे सर्व बेकायदेशीर असून गुन्हा आहे. त्यासाठी लावण्यात आलेली कलमे योग्य आहेत. भारतीय समाजातील नियमांची जाणीव ठेवून पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे तसेच ठेवावेत आणि ही याचिका निकाली काढावी.
२. तोकड्या कपड्यांमधील अश्लील नृत्याला गुन्हा समजण्यास न्यायालयाचा नकार !
अ. न्यायालयाने यात सर्वप्रथम भारतीय दंड विधान कलम २९४ रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या काही निकालपत्रांचा उल्लेख केला. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, बंदिस्त खोली किंवा हॉटेल ही सार्वजनिक ठिकाणे नाहीत, तसेच तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील हावभाव करून नाचणे कुणाला आवडले नाही आणि त्याने याला विरोध दर्शवला, तर गुन्हा नोंदवता येतो. ‘नाचणार्या मुलींवर पैसे फेकल्याने त्यांचा विनयभंग होतो’, असे म्हणणे चुकीचे आहे. त्याचा इतरांना उपद्रव वाटला किंवा अयोग्य कृती वाटली, तर गुन्हा नोंद होऊ शकतो. या प्रकरणात सर्वसंमतीने नाचगाणे होत होते, तसेच तोकड्या कपड्यांतील मुली नाचणे, हे उपस्थितांना आक्षेपार्ह वाटत नव्हते. त्यामुळे हा गुन्हा होऊ शकत नाही.
आ. ‘महाराष्ट्र मुंबई दारूबंदी कायद्या’तील कलमांचा आधार घेण्यासाठी प्रथमदर्शनी माहिती अहवालात ‘मद्य खरेदी केले, विकले आणि सेवन केले’, असे लिखाण आलेले नाही. त्यामुळे मद्याच्या बाटल्या मिळाल्या किंवा मद्याचे रिकामे पेले मिळाले; म्हणून दारूबंदी कायद्यातील कलमांचा आधार घेता येणार नाही.
इ. या वेळी न्यायालयाने महाराष्ट्र पोलीस कायद्याविषयी काही जुन्या निकालपत्रांचा संदर्भ दिला. त्यात ‘हॉटेलमध्ये महिला वेटर्सने तोकड्या कपड्यात वावरणे आणि ग्राहकांना मद्य वाटप करणे, हा गुन्हा होत नाही’, असे म्हटले होते. यासमवेतच महाराष्ट्र सरकारने हॉटेलमध्ये महिलांनी पुरुषांना मद्य देणे, नाचणे इत्यादी गोष्टी होऊ नयेत; म्हणून विविध कायदे केले आहेत. ‘पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेलमध्ये महिलांनी तोकड्या कपड्यात ग्राहकांना मद्य आणि इतर खाद्यपदार्थ पुरवणे चालू ठेवणे अन् लहान उपाहारगृहांमध्ये त्यावर बंदी घालणे अयोग्य आहे’, असे न्यायालयाने जुन्या खटल्यात नमूद केले आहे. तेथे श्रीमंतांना काही विशेष सवलत देणे आणि सर्वसामान्यांपासून ती हिरावून घेणे, असा भेदभाव समजला गेला. महिला किंवा मुली यांनी ग्राहकांना मद्य देणे मान्य आहे, तर मग ‘केवळ त्यांनी नृत्य केले; म्हणून तीव्र कामवासना कशी जागृत होते ?’, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. कायद्यांची काही कलमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी रद्दबातल ठरवली.
३. न्यायालयाकडून अश्लील नृत्य करणार्या महिला आणि अनैतिक समाज यांचे समर्थन !
सध्याच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ असे म्हणते की, काळ पालटलेला आहे. ज्या गोष्टी पूर्वी समाजाच्या दृष्टीने अयोग्य वाटत होत्या, त्यांना आता जनता स्वीकारत आहे. पोलिसांना एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटते; म्हणून ती कायद्याने गुन्हा आहे, असे नव्हे, तर ‘सर्वसामान्य जनतेला काय वाटते ?’, याचा विचार होणे आवश्यक आहे. ग्राहक तोकड्या कपड्यात मादक हावभाव करत नृत्य करणार्या महिलांना स्वीकारत होते, तर पोलिसांना तो गुन्हा कसा काय वाटू शकतो ? नागपूर खंडपीठ पुढे असे म्हणते की, चित्रपटांमधील दृश्यांना चित्रपट परिनिरीक्षण मंडळ मान्यता देते. सौंदर्यस्पर्धांच्या चाचण्यांमध्येही असे सर्व प्रकार होत असतात. मग येथे हॉटेलमध्येच हा गुन्हा कसा काय होऊ शकतो ? त्यामुळे आपण संकुचित विचार सोडून दिला पाहिजे. आज समाज काय स्वीकारतो, हे पहाणे योग्य होईल. यात कुणाची तक्रार असेल, तर हा गुन्हा होऊ शकेल आणि भारतीय दंड विधानातील कलम २९४ कार्यवाहीत येईल, अन्यथा नाही.
४. अश्लील नृत्यावर पैसे उधळणे निंदनीय आहे, हे न्यायालयाला समजेल का ?
एका जुन्या खटल्यात ‘महिलांवर पैसे उधळण्यापेक्षा ती रक्कम देयकात वाढवून मालकाकडे जमा करावी’, असा पर्याय पोलिसांनी सुचवला होता. तेथे न्यायालय म्हणते की, ज्यांच्यासाठी हे पैसे दिलेले आहेत, ते त्यांना न मिळता मालकाला मिळणे चुकीचे आहे. हा विषय ग्राहक, नर्तकी आणि हॉटेल मालक यांच्यातील आहे. तेथे पोलिसांचा संबंध येऊ शकत नाही. कायद्याचा किस पाडून एखादा गुन्हा होतो किंवा नाही, यात काही अर्थ नाही. हॉटेल किंवा अन्य ठिकाणी मद्यपान करून नाचगाणे करून आणि त्यांच्यावर पैसे उधळून अश्लील कृत्य करणे निंदनीय आहे. ‘भारतीय समाज हे स्वीकारू शकत नाही, हे न्यायालयाला समजेल, तो सुदिन’, असे म्हणता येईल.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१५.१०.२०२३)