देशात वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये रस्ते अपघातात ११.७ टक्क्यांची वाढ !

नवी देहली – देशात रस्ते अपघातामध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये  ११.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये एकूण ४ लाख ६१ सहस्र ३१२ रस्ते अपघात झाले, तर वर्ष २०२१ मध्ये ४ लाख १२ सहस्र ४३२ रस्ते अपघात झाले. वर्ष २०२२ मध्ये १ लाख ६८ सहस्र ४९१ लोकांचा मृत्यू झाला, तर ४ लाख ४३ सहस्र ३६६ जण घायाळ झाले. ही संख्या वर्ष २०२१ पेक्षा अधिक आहे. हे आकडे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने प्रसारित केले आहेत.

वर्ष २०२२ मध्ये वाहतूक नियम मोडल्यामुळे अनेक अपघात झाले. वेगाने गाडी चालवल्यामुळे ७१ टक्के अधिक मृत्यू झाले. चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याने ५.४ लोकांचा मृत्यू झाला. दारू पिऊन गाडी चालवल्याने १० सहस्रांहून अधिक अपघात झाले. सिग्नल मोडल्याने झालेल्या अपघातांत वर्ष २०२१ च्या तुलनेत ८२.५५ टक्के वाढ झाली.

शिरस्त्राण न घातल्याने ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

वर्ष २०२२ मध्ये दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये शिरस्त्राण न वापरल्याने ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यात ३५ सहस्र ६९२ जण चालक होते, तर १४ सहस्र ३३७ जण मागे बसणारे होते.

चारचाकी वाहनात सीटबेल्ट न बांधल्याने १६ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

चारचाकी वाहनामध्ये सीटबेल्ट न बांधल्याने १६ सहस्र ७१५ लोकांचा अपघातांच्या वेळी मृत्यू झाला. यात ८ सहस्र ३८४ चालक, तर ८ सहस्र ३३१ प्रवासी यांचा समावेश आहे.