मालवण येथे ‘राजकोट’ किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे आज भूमीपूजन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
मालवण – मालवण येथे ४ डिसेंबर या दिवशी साजर्या होणार्या नौदल दिनाच्या निमित्ताने येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या ठिकाणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. या वेळी ३४ गडकिल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्रित करून पुतळ्याच्या पायाभरणीच्या ठिकाणी वहाण्यात येणार आहे. या मातीच्या कलशांची ढोलताशांच्या गजरात मालवण शहरातून यात्रा काढण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये राजकोट आणि मेढा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. ‘राजकोट’ किल्ल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे. कलश मिरवणूक जाणारे रस्ते सडासंमार्जन, रांगोळी काढून आणि आकर्षक विद्युत् रोषणाई करून सजवण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी दिली.