गोव्यातील ६ कॅसिनोंवर अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी
पणजी, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – अंमलबजावणी संचालनालयाच्या कोची विभागाने ३० ऑक्टोबरच्या रात्री पणजी आणि आसपासच्या परिसरातील कॅसिनो मिळून एकूण ८ ठिकाणी धाडी टाकल्या. या ८ पैकी ६ धाडी या कॅसिनो कार्यालयांवर टाकण्यात आल्या. या धाडी ‘मनी लाँडरींग’ प्रकरणी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुंतवणूकदारांना गंडवून कोट्यवधी रुपये लाटण्यामध्ये गोव्यातील कॅसिनोंचा सहभाग आढळून आल्याने, तसेच सुमारे ५० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये कॅसिनोंचा हात असल्याचा अन्वेषण यंत्रणांना संशय आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील कॅसिनो कोट्यवधी रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ थकबाकीमुळे चर्चेत आहेत. वस्तू आणि सेवा कर संचालनालयाने ‘डेल्टाकॉर्पस्’सह इतर कॅसिनो आस्थापनांना कोट्यवधी रुपयांची थकबाकीची रक्कम फेडण्यासाठी नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडीच्या वेळी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती चालू होती. कॅसिनोच्या मालकांनी ‘वस्तू आणि सेवा कर’ संचालनालयाने पाठवलेल्या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.