म्हादई विषयावर शासन आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये अधिक संवादाची निकड ! – महाधिवक्ता देवीदास पांगम
पणजी – म्हादईच्या विषयावर पर्यावरण अभ्यासक, विचारवंत आणि शासन यांच्यात अधिक संवाद होणे आवश्यक आहे. यामुळे अधिकाधिक धोरणात्मक सूत्रे राज्याला लाभतील, असे मत गोव्याचे महाधिवक्ता देवीदास पांम यांनी केले. एका अभ्यास गटाच्या वतीने ‘म्हादईविषयी बहुआयामी अभ्यास’ या विषयावरील २ दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी हे वक्तव्य पांगम यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘एका खोर्यातून दुसर्या खोर्यात पाणी वळवल्यास होणारे परिणाम’ या विषयावर जलविज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि जीवशास्त्रातील तज्ञ यांना एकत्र आणून अभ्यास होणे आवश्यक आहे. जलस्रोत विभागाचे माजी मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांनी वर्ष १९९० पासूनचा म्हादई तंट्याचा उगम आणि प्राधिकरणातील न्यायालयातील लढा यांविषयी माहिती दिली.
म्हादई नदीचे पाणी वळवल्यास त्याचा गोव्यावर होणारा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी वैज्ञानिक आधारावर सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे, असे नाडकर्णी म्हणाले. डॉ. प्रकाश पर्येकर यांनी गोव्याची जीवनरेखा म्हणून म्हादईचे महत्त्व सांगितले आणि आभार मानले. २ दिवस चालणार्या या कार्यशाळेत म्हादई नदीच्या विविध आयामांवर विविध विषयांतील सुमारे २० सादरीकरणे पहायला मिळतील आणि शेवटी गोव्याच्या दृष्टीकोनातून म्हादईवर ज्ञानाचे भांडार तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.