संगीतोपचार !
कॅनडा येथील मॅकगिल विश्वविद्यालयाने संशोधनाच्या अंती दु:खद गीत ऐकल्याने लोकांच्या शारीरिक वेदना अल्प होऊ शकतात, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे रुग्णांच्या वेदनेची जाणीव (केवळ) १० टक्क्यांपर्यंत अल्प झाली. ‘वेदनेच्या संवेदनेपेक्षा मेंदू संगीतातून निर्माण होणार्या संवेदनांना प्राधान्य देतो. त्यामुळे शरिराला वेदना होत असल्या, तरी मनाला वेदनेची जाणीव करून देणारे संदेश प्रसारित होत नाहीत’, असे त्यामागील शास्त्र आहे. कुठल्याही विकारांमध्ये मानसिक भाग हा महत्त्वाचा असतो. संगीत हे मनावर खोल परिणाम करणारे आहे. त्यामुळे अनेक विकारांवर संगीत ऐकण्याचा लाभ होतो. याविषयी भारतात प्राचीन काळापासून संशोधन करण्यात आले आहे आणि सध्याही अनेकविध स्तरांवर ते चालू आहे. पाश्चिमात्य देशांत १८ व्या शतकात संगीतचिकित्सेचा अभ्यास चालू झाला आणि १९ व्या शतकात प्रथम अमेरिकेत त्याचे प्रयोग करण्यात आले. दुसर्या महायुद्धानंतर या प्रयोगांना गती आली. वरील प्रयोग हा त्याचा एक भाग आहे. संगीतोपचारांविषयी कुणाचेच दुमत होणार नाही; परंतु ‘दुःखद संगीत ऐकल्याने शारीरिक वेदना अल्प होणे, हा एका टप्प्यापर्यंतचा प्रयोग असू शकतो’, असे म्हणावेसे वाटते.
प्राचीन भारतीय शास्त्र आणि त्यावर आधारित सध्याचे संशोधन
‘गंधर्व वेद चिकित्सा’ असा उल्लेख सामवेदात आहे. हा संगीतोपचारांशीच संबंधित आहे. रागातील कोमल स्वर मेंदूला शिथिल करतो आणि झोप देतो, तर शुद्ध स्वर ऊर्जा किंवा जागरूकता देतो. संगीताच्या ग्रंथांमध्ये कोणते ध्वनी कफ, पित्त, वात अशा विकारांवर उपयुक्त ठरू शकतात ? इतकेच काय कुठल्या वेळेत ? कुठला राग ? किती वेळ ऐकावा ? एवढ्या बारकाईने उल्लेख भारतीय ग्रंथांत करून ठेवलेले आहेत. सकाळच्या वेळी ऐकण्यासाठी मध्य किंवा मंद्र सप्तकातील भूपाळी आहे, तर ‘रात्री झोपतांना खर्ज किंवा मध्य सप्तकातील संगीत ऐकावे’, असे म्हटले गेले आहे. मनाची एकाग्रता वाढवणारा तानपुरा आहे, जो ध्यानसाधनेसाठीही उपयुक्त आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील आध्यात्मिक स्तरावरील चैतन्य, हेच रोगनिवारणामागील मूळ बीज आहे. त्यातील आध्यात्मिक भागामुळेच चंचलता न्यून होऊन एकाग्रता वाढते आणि ही मनाची एकाग्रताच अनेक शारीरिक, तसेच मानसिक विकारांवरही काम करते.
संभाजीनगर येथील वैद्य अतुल मुरूगकर यांनी पंचकर्म चालू असतांना ठराविक रागदारीतील संगीत लावून केलेले प्रयोग लाभदायक ठरले आहेत. जमशेदपूर येथील ‘टाटा कॅन्सर सेंटर’मध्येही कर्करोगाशी झुंज देणार्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष संगीत ऐकवले जाते. परिणामी ते मनाने खंबीर झाल्याचे लक्षात आले. प्रसिद्ध बासरीवादक सचिन जगताप यांनी संगीत चिकित्सेमध्ये संशोधन करून विविध व्याधींचे ४३७ रुग्ण बरे केले आहेत. शरिरातील उष्णता (तेजतत्त्व) वाढल्यावर आकाशतत्त्वाशी संबंधित असणारे ‘केदार आणि मालकंस’ अन् आपतत्त्वाशी संबंधित असणारा ‘मेघमल्हार’ हे राग ऐकल्यावर उष्णता उणावून शीतलता वाढते. सोरायसिस (एक त्वचारोग)वर राग ‘मधुवंती’, पित्तावर वृंदावनी सारंग, दम्यावर ‘मिया मल्हार’, पाठदुखीवर ‘मारू बिहाग’, अर्धशिशीवर ‘दरबारी कानडा’ आणि उच्च रक्तदाबावर ‘बागेश्री’, ‘गोरख कल्याण’ हे राग उपयुक्त ठरत असल्याचे प्रयोग कलेविषयी वैज्ञानिक संशोधन करणार्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केले आहेत. आम्लपित्त, दाह, उष्णता आणि पित्त यांवर ‘काफी’, ‘खमाज’, ‘मारवा’, ‘कलावती’ हे राग ऐकल्यास फरक पडतो. ‘ओडव’, ‘हंसध्वनी’, ‘दुर्गा’, ‘भूप’ या रागांतील संगीत रुग्णांना नैराश्यातून बाहेर येण्यासाठी, तर निद्रानाशासाठी राग ‘यमन कल्याण’, ‘बागेश्री’ आणि ‘भैरवी’ ऐकवला जातो. मान तणावावर ‘अहीर भैरव’ आणि ‘पुरिया’, संतापावर ‘मधुवंती’, ‘मधुकंस’, ‘मारूबिहाग’ हे राग उपयुक्त ठरतात. हृदयविकारासाठी ‘भैरवी’ आणि ‘शिवरंजनी’ हे राग ऐकवले जातात. बासरी, संतूर, जलतरंग यांचे वादनही उत्साहवर्धक असते. सारंगी, सरोद आणि सतार आदी वाद्यांतील कंप हृदयापर्यंत पोचतो. स्मृतीभ्रंश असलेल्या रुग्णांना विशिष्ट ताल ऐकवले जातात. संगीत आणि मानसोपचार तज्ञ यांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास अनेक रोगांवरही संगीतचिकित्सा प्रभावी ठरते. संगीतोपचारामागील शास्त्र म्हणजे मेंदूत ‘डोपामाइन’ संप्रेरक (हार्मोन) वाढण्यास प्रोत्साहन मिळते आणि चिंता अन् नैराश्य दूर होण्यास साहाय्य होऊ शकते. संगीताने सहनशक्तीही वाढते. कोरोना महारामारीच्या काळात काही कोविड केंद्रांत विशिष्ट प्रकारचे संगीत लावले जात होते. त्यामुळे तेथील रुग्णांचे मनोबल वाढले. हल्ली खासगी आस्थापनांमधील कर्मचार्यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी आणि कामाची क्षमता वाढवण्यासाठी संगीतचिकित्सा केली जाते. आता औषधोपचारासमवेत पूरक म्हणून संगीतोपचार करून घेण्याची पद्धत रूढ होत आहे. हृदयरोगासारख्या काही मोठ्या विकारांची आरंभीची लक्षणे मानसिक असल्याने आरंभीच त्यावर संगीतोपचार चालू करून मोठे विकार टाळू शकतो. मनोकायिक व्याधींत संगीतोपचार विशेष परिणामकारक ठरतात. संगीतोपचारात संतुलित जीवनशैलीसाठी सकारात्मक सामर्थ्यही मिळवता येते. भारतीय जीवनशैलीत संगीताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे; किंबहुना त्याने ती व्यापली आहे. संगीताची निर्मिती ही देवतांकडून झाली आहे. आमचे धार्मिक कार्य, सण, उत्सव, व्रते संगीताविना पूर्ण होत नाहीत. थोडक्यात सांगायचे म्हणजे पाश्चात्त्यांनी कितीही पुढची पुढची संशोधने केली, तरी ते अद्यापही परिपूर्ण अशा टप्प्यापर्यंत जाण्यास त्यांना अवधी लागेल; परंतु ऋषिमुनींनी लाखो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून ते अखिल मानवजातीसाठी मांडून ठेवले आहे आणि भारतीय पिढ्यांतून ते पुढे आले आहे, त्याचा यथायोग्य आदर व्हायला हवा !