तमिळनाडू येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून हिंदु धर्माचा पुरस्कार

एकता दौडमध्ये सहभागी  मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि अन्य

पणजी, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी तमिळनाडू येथे थेवर समाजाचे गुरु, खासदार, स्वातंत्र्यसैनिक पसुम्पटन मुथूरामलिंग थेवर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती लावली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सुमारे ५ लाख लोकांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सनातन धर्माचा जोरदार पुरस्कार केला आणि सनातन धर्म नष्ट करू पहाणारे तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन यांच्या विधानाचा निषेध केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी त्यांच्या भाषणात सनातन हिंदु धर्माचे महत्त्व आणि भाजपची भूमिका यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी मुथूरामलिंग यांच्या पूर्णाकृती सुवर्ण पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या कार्यक्रमाविषयी गोव्यातील प्रसारमाध्यमांना माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या राज्यात जाऊन लाखो लोकांसमोर मला माझे विचार मांडता आले, ही माझ्यासाठी पुष्कळ महत्त्वाची गोष्ट आहे. मुथूरामलिंग यांनी ब्रिटीश काळात सरसकटपणे दलितांना गुन्हेगार ठरवणारा कायदा रहित करवून घेतला. त्यांनी मदुराई येथील मंदिरे दलितांसाठी खुली करून घेतली. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे त्यागपत्र दिल्यानंतर मुथूरामलिंग यांनीही काँग्रेस सोडली. त्या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’चे मुथूरामलिंग हे उपाध्यक्ष बनले. त्यांनी आमदार आणि खासदार यांची निवडणूक एकाच वेळी लढवून दोन्ही जागा जिंकल्या. दोन वेळा असेच झाले. दोन्ही वेळेला त्यांनी खासदारपद कायम ठेवले. तिसर्‍यांदा ते खासदार झाले आणि नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. थेवर समाज त्यांना गुरूंचे स्थान देतो.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तुकडे तुकडे गँग’ मुळासकट नष्ट केली ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी – देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व राज्यांना एकत्रित आणून हे राष्ट्र संघटित करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. म्हणूनच देश आज संघटित आहे. देशाचे विभाजन करण्यासाठी ‘तुकडे तुकडे गँग’ देशात कार्यरत झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे ही ‘गँग’ मुळासकट नष्ट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरसाठी लागू असलेले ३७० कलम हटवण्यात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे आयोजित राष्ट्रीय एकदा दौडच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात म्हटले. ते पुढे म्हणाले, ‘‘देश अखंडित राखण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाची अखंडता जपण्यासाठी प्रत्येकाने शपथबद्ध होण्याची आवश्यकता आहे.’’