भूसंपादन रखडल्यामुळे पुणे महापालिकेला आर्थिक फटका !
पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्या दृष्टीने महापालिकेने नगर रस्ता परिसराचा एकात्मिक वाहतूक आराखडा सिद्ध केला आहे, तसेच समतल, विलगक उड्डाणपूलही प्रस्तावित केले आहेत. सेवा रस्ता आणि रस्ता रुंदीकरणाची कामे ही प्रस्तावित असून येरवडा परिसरातील ७ किलोमीटर अंतराचे रस्ता रुंदीकरणही प्रस्तावित आहे. यासाठी ९१६ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. १५ जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला हा खर्च करावा लागणार असून भूसंपादन रखडल्यामुळे याच्या खर्चात २९४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रस्ता रुंदी करण्यासाठी भूसंपादन रखडल्यामुळे महापालिकेवर आर्थिक भुर्दंड पडत आहे, अशी संमती महापालिकेकडून माहिती अधिकारात मिळाली. रुंदीकरणाअभावी नगर रस्त्यावरील चौकात वाहतूक कोंडी होत आहे, तसेच सेवा रस्ताही कागदावर राहिला असून विमाननगर चौक, इनॉर्बिट मॉल चौक आणि शास्त्रीनगर येथे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
भूसंपादनाची मूळ रक्कम अल्प आहे; मात्र प्रतिवर्षी त्या रकमेवर १२ टक्के व्याज लागल्यामुळे ती रक्कम वाढली आहे. जसा निधी उपलब्ध होईल, तसे काम चालू आहे, असा दावा महापालिकेच्या भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाने केला आहे.