पुणे येथील ‘ससून’मधील कैदी रुग्ण समितीचे ‘अध्यक्षपद नको’, अशी डॉ. धिवारे यांची मागणी !
पुणे – ‘ससून रुग्णालया’तून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पसार झाला होता. त्याची चौकशी चालू आहे. आता ‘ससून’मधील कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजित धिवारे यांनी ‘आपल्याला हे अध्यक्षपद नको’ अशा आशयाचे पत्र अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे दिले आहे. डॉ. धिवार यांची नियुक्ती २७ सप्टेंबर या दिवशी झाली होती. ते रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षकही आहेत. डॉ. धिवारे यांनी ‘अध्यक्षपद नको’ असे पत्र दिले असले, तरी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
डॉ. धिवारे म्हणाले की, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्षपद वरिष्ठ प्राध्यापकांकडे सोपवावे, अशी मागणी मी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे. माझ्याकडे उपअधीक्षक पदाचा कार्यभार असल्याने त्याचे दायित्व सांभाळावे लागते. त्यामुळे मला सदस्य समितीमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे.