आपल्या विकासातील जातीव्यवस्थेचा अडसर दूर करायला हवा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरातील ‘ब्राह्मण रत्ने’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा !
पुणे – आज महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय स्थिती जातीपातीमुळे विस्कटत चालली आहे. संत-महंतांनी जातीची जी वीण विणली होती, ती आता विस्कटत आहे. प्रबोधन आणि विकास यांमुळे मनातून गेलेली जात ही केवळ स्वार्थाच्या राजकारणामुळे पुन्हा वर येत आहे. जातीपातीचे राजकारण थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जातीच्या वर येत ‘सगळ्यांचा विकास ही ईश्वराची पूजा आहे’, असा विचार करायला हवा. आपल्या विकासातील जातीव्यवस्थेचा अडसर दूर करायला हवा, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘ब्राह्मण रत्ने’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.
अनुमाने मागील २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्या कर्तृत्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकार्यासाठी समर्पित ब्राह्मण व्यक्तीमत्त्वांचा समावेश असलेला १ सहस्र २०० पानांचा ‘ब्राह्मण रत्ने’ हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. हा ग्रंथ ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिके’च्या वतीने साकारण्यात आला आहे.
या वेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी हेही या वेळी उपस्थित होते. श्रीमंत पेशवे घराण्याचे वंशज आणि लोकमान्य टिळकांचे वंशज यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी ग्रंथासाठी विशेष सहकार्य देणारे ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते. त्यामध्ये चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, श्री धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, साण्डू ब्रदर्सचे शशांक साण्डू, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्राह्मण असणे ही शुद्ध सात्त्विक चारित्र्याची जोपासना आहे ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी
अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, राजकीय स्वार्थामुळे पद्धशीरपणे ब्राह्मणद्वेष पसरवला जातो. हिंदु द्वेष म्हणजे सेक्युलर वाद आणि ब्राह्मण द्वेष म्हणजे पुरोगामित्व ! अशावेळी तर्कशुद्ध अभ्यास करून सर्वांना सोबत घेऊन जाणे, असे ब्राह्मण समाजाने पुढे जायला पाहिजे. तर्कशुद्ध विचारांनी सत्य सांगितले, तर द्वेषाचा पराभव होईल. ब्राह्मण असणे ही शुद्ध सात्त्विक चारित्र्याची जोपासना आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण होईल.
जात-धर्म विसरून ब्राह्मण समाजाने समाजाला एकत्र केले ! – राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेते
या वेळी राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘‘यशाच्या काही सहस्र कोटी आकड्यांपर्यंत पोचणार्या एकाही ब्राह्मणाने एकदाही सोय, सवलत आणि आरक्षण मागितले नाही. वर्षानुवर्षे निंदा, नालस्ती, उपेक्षा विशेषकरून राजकीय कारणासाठी समाजाचा उपयोग या सगळ्यातून ब्राह्मण वर्ग उठून उभा राहिला पाहिजे. जात-धर्म विसरून ब्राह्मण समाजाने समाजाला एकत्र केले. त्याचप्रमाणे राष्ट्रउत्थानासाठी एकत्र यावे.
संपादकीय भूमिकाजातीपातींमध्ये न अडकता सर्वांनी एकत्र आल्यासच राष्ट्रोत्थानाचे महत्कार्य घडू शकते ! |