मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद !
-
‘सातारा बंद’ला समाजघटक आणि व्यापारी यांचा १०० टक्के प्रतिसाद !
-
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद
सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘सातारा बंद’ची हाक देण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापारी आणि सर्व समाजघटक यांनी १०० टक्के ‘बंद’ पाळला. ‘बंद’ कालावधीत कोणतीही हानी होऊ नये; म्हणून एस्.टी. महामंडळाने बसगाड्या बंद ठेवल्या होत्या. ‘सातारा बंद’मुळे सार्वजनिक मालमत्तेची हानी टळली असली, तरी प्रवाशांची गैरसोय झाली. सध्या परीक्षा चालू असल्यामुळे गावांतून येणार्या विद्यार्थ्यांनाही ‘बंद’चा फटका बसला आहे.
सकाळपासूनच बाजारपेठ राजवाडा, शिवतीर्थ, बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. ग्रामीण भागातीलही बाजारपेठा बंद असल्याचे आढळून आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जोर वाढू लागला असून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाज आग्रही होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा पोलीस दलाकडूनही संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख स्वत: रस्त्यावर उतरून पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद !
कोल्हापूर – कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्या सर्व बसगाड्या बंद करण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात कर्नाटकच्या गाड्यांना लक्ष्य केले जात असल्याने कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. अचानक बसगाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले, तर खासगी वाहतूक करणार्या वाहनधारकांनी प्रवाशांकडून नेहमीच्या दरापेक्षा दुप्पट-तिप्पट आकारणी करत प्रवाशांची लूट केली.
अन्य जिल्ह्यांतील घडामोडी
१. ‘कुरुंदवाड ते पुणे स्टेशन’ ही गाडी दत्त कारखाना, शिरोळ येथे थांबली असतांना अज्ञातांकडून चारही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यात गाडीच्या काचा फुटल्या; मात्र यात कोणीही प्रवासी घायाळ झाला नाही. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.
२. एस्.टी.च्या अनेक शहरांमधील फेर्या रहित होत आहेत. कोल्हापूर-संभाजीनगर ही गाडी बार्शीतून परत आली. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन कोणते मार्ग बंद करायचे, तो निर्णय घेण्यात येईल, असे कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.
सिल्लोड येथे मराठा आंदोलकांनी सरकारची अंत्ययात्रा काढली !
२९ मंत्र्यांच्या निषेधार्थ २९ तरुणांचे मुंडन !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड येथील भवनमध्ये सरकारची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी मराठा आंदोलकांनी गावातून सरकारची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत गावातील सर्व समाजातील महिला-पुरुष, तरुण, तसेच आबालवृद्ध सहभागी झाले होते. या वेळी सरकारमधील मंत्र्यांच्या छायाचित्रांना श्रद्धांजली वाहिल्याचे फलकही झळकावण्यात आले, तसेच अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या छायाचित्राचेे दहनही आंदोलकांनी केले. अंत्ययात्रेनंतर २९ मराठा तरुणांनी मुंडन करत २९ मंत्र्यांचा निषेध केला आणि सरकारवर स्वत:चा रोष व्यक्त केला.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंधूंना घोषणा देण्यास भाग पाडले !
नेत्यांना गावबंदी असतांना पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ गफ्फार हे निमखेडा ते जिवरग टाकळी प्रवास करत होते. त्यांच्या गाडीवर विधान परिषद सदस्याचे स्टीकर आंदोलनकर्त्यांना दिसून आले. या वेळी त्यांनी गाडी थांबवत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच गफ्फार यांना अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा देण्यास सांगितल्यावर त्यांनी तशा घोषणा दिल्या. या घोषणानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी २ जणांची आत्महत्या !
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) येथील २ तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे येथील सागर वाळे (वय २५ वर्षे) याने ३१ ऑक्टोबर या दिवशी मराठा आरक्षणासाठी आपल्या घरामागे असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास ही घटना लक्षात आली. ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. यासाठी कुणालाही उत्तरदायी धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा’, असा उल्लेख त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या आपल्या चिठ्ठीत केला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोखरी गावातील शुभम गाडेकर याने शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो ‘एम्.पी.एस्.सी.’च्या स्पर्धा परीक्षेची सिद्धता करत होता. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ आणि आई-वडील आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील बसगाड्यांची सेवा खंडित झाल्याने प्रवाशांना फटका !
- बसस्थानकांवर प्रवासी अडकून राहिले !
- मराठवाडा येथे ४ सहस्र ९७१ ‘बसगाड्यां’च्या फेर्या रहित !
सांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – मराठा आरक्षणावरून यवतमाळ आणि बीड येथे ‘बसगाड्यां’ची जाळपोळ केल्यानंतर ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून कोल्हापूर आणि सांगली येथून सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड येथे जाणार्या बसगाड्यांच्या फेर्या रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसगाड्यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला असून अनेक बसस्थानकांवर बसगाडी नसल्याने प्रवासी अडकून पडले आहेत.
बीडमध्ये तहसीलदारांची ३ वाहने फोडण्यात आली आहेत. राज्यातील १ सहस्र ३२८ गावांत उपोषणे चालू आहेत, तर शेकडो गावांत पुढार्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यात आंदोलन तीव्र झाल्याने मराठवाड्यातील एकूण ४७ पैकी ३० आगारांतील बसगाड्यांची बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलकांनी १३ बसगाड्या फोडल्या, तर २ दिवसांत बसगाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी अशीच परिस्थिती मराठवाड्यात राहिल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून मराठवाडा येथे जाणार्या बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
बसस्थानकांवर शुकशुकाट आहे. सांगली बसस्थानकावर सोलापूर आणि धाराशिव येथे जाणारी एकही बसगाडी नव्हती. विशेष म्हणजे पणजी-अक्कलकोट ही बस ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १.३० वाजता सांगली बसस्थानकावरच थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे पणजी येथून सोलापूरकडे जाणार्या प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना संपूर्ण रात्र बसस्थानकावर काढून दुसर्या दिवशी अन्य वाहनाने आपल्या गावी जावे लागले. बसगाड्या बंद केल्याने सांगली बसस्थानकांवरील ३ पैकी २ लोखंडी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
कुणबी प्रमाणपत्र हवे त्यांनी घ्यावे, ज्यांना नको असेल त्यांनी घेऊ नये ! – मनोज जरांगे पाटील
जालना – मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. यापूर्वी ६० टक्के मराठा आरक्षणात गेले आहेत. जे थोडे राहिले आहेत, त्यांच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. ज्यांना घ्यायचे ते कुणबी प्रमाणपत्रे घेतील. ज्यांना नको असेल, ते घेणार नाहीत. कुणाला बळजोरी केलेले नाही, असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कुणबीचा दुसरा अर्थ शेती आहे. शेती शब्दाची लाज वाटण्याइतका मराठा खालच्या विचाराचा नाही. शेतीच्या आधारावर १७ ते १८ जातींना आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याच आधारावर आम्हाला आरक्षण मिळायला हवे. आरक्षण पूर्ण घेतल्याविना मी थांबणार नाही. अर्धवट दिलेले आरक्षण जमणार नाही. त्याचे परिणाम वेगळे होतील. या संदर्भात अध्यादेश आम्हाला मान्य नाहीत, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी कायम रहाणार आहे.
मराठा आंदोलकांकडून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ !
बीड – मराठा आंदोलकांनी येथील राष्ट्रवादी भवन जाळले असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही पेटवण्यात आले. यासमवेत आंदोलकांनी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ केली. या वेळी क्षीरसागर यांची ४ ते ५ वाहने आंदोलकांनी पेटवली. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, तसेच जाळपोळीचे व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होऊ, नयेत यासाठी ‘इंटरनेट’ सेवाही बंद करण्यात आली आहे.