बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘लोकांच्या मनाचा भंग करून समाज विस्कळीत करणे’, हा अधर्म असून ‘लोकांच्या मनाचे एकीकरण करणे’, हा धर्म आहे. एकच एक तत्त्व असून अनेकाकारात पहाण्याची जी वृत्ती, हा अधर्म आणि हाच प्रपंच आहे, तसेच ‘अनेकाकारात एक तत्त्व पहाणे’, हा धर्म अन् हाच परमार्थ आहे.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘धर्माचे रहस्य’, सुवचन क्र. ८)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. सर्व धर्मांचे तत्त्व एकच असणे; परंतु प्रत्येकाला ‘माझा धर्म श्रेष्ठ आहे’, असा अहंकार असल्याने धर्माधर्मांत तेढ निर्माण होणे : ‘समाजात द्वैत आणि अद्वैत अशा दोन विचारधारा आहेत. द्वैत म्हणजे ‘परमेश्वरापासून मी कोणीतरी वेगळा आहे’, असे समजणे आणि अद्वैत म्हणजे ‘चराचरात भरलेला परमेश्वर माझ्यातही आहे’, असे समजणे. जगात अनेक धर्म आहेत, उदा. हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन इत्यादी. हे सर्व धर्म आपल्याला निर्माण करणार्या विधात्याची पूजा करायला शिकवतात. प्रत्येकाची पूजा करण्याची आणि साधना किंवा उपासना करण्याची पद्धत वेगळी असली, तरी सर्व धर्मांचे लोक त्या परमेश्वराला शरण जातात, त्याची करुणा भाकतात आणि त्याच्याकडे सुख अन् आनंद यांची याचना करतात. याविषयी सर्व धर्मांचे तत्त्व आणि पाया एकच असतो. सर्व धर्म हे त्या वैश्विक शक्तीला मान देतात; परंतु अहंकाराच्या पोटी प्रत्येक जण ‘माझा धर्म श्रेष्ठ आहे’, असे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. असे झाल्यामुळे धर्माधर्मांत तेढ निर्माण होते आणि ईश्वराची उपासना करण्यापेक्षा ‘आपला धर्म कसा वाढेल ?’, याकडे लोकांचे लक्ष जाते. त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होते. वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकमेकांचा तिरस्कार करू लागतात; परंतु ते हे विसरतात की, सगळ्या धर्मांचे उद्दिष्ट ‘परमेश्वरप्राप्ती’ हे आहे.
यासाठी प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘लोकांच्या मनाचा भंग करून समाज विस्कळीत करणे’, हा धर्म नसून तो अधर्मच आहे.’ ‘सर्व लोकांमध्ये एकी झाली, तर लोक एकमेकांना साहाय्य करून समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेऊन ठेवतील’, यात शंकाच नाही. धर्म, भाषा, जात-पात, या सर्व गोष्टी सामाजिक शांतता भंग करणार्या असू शकतात. धर्माचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन न करता आपापल्या घरातून आपण जर परमेश्वराचे पूजन केले, तर तो खरा धर्म होईल आणि कुणाच्याच मनाला यातना पोचणार नाहीत.’
म्हणून शिर्डीचे साईबाबा म्हणायचे, ‘सबका मालिक एक है ।’
२ आ. सगुण आणि निर्गुण उपासना
२ आ १. सगुण उपासनेत मूर्तीपूजेला आणि निर्गुण उपासनेत सेवाधर्म अन् नामस्मरण यांना महत्त्व असणे : जगात उपासनेचे २ प्रकार आहेत – एक सगुण उपासना आणि दुसरी निर्गुण उपासना. सगुण उपासनेमध्ये माणसे मूर्तीची पूजा करतात. ‘त्या मूर्तीमध्येच देवत्व आहे, म्हणजेच वैश्विक शक्तीचा संचार आहे’, असे समजतात आणि त्या मूर्तीची मनोभावे पूजा करून तिला नमस्कार करतात; याउलट निर्गुण उपासक मूर्तीपूजेच्या विरुद्ध असतात. सामान्य माणसांना मात्र सगुण पूजाच समजते. निर्गुण पूजा म्हणजे ‘चराचरात देव आहे’, असे समजून वेगवेगळ्या जिवांची केलेली सेवा. निर्गुण पूजेत सेवाधर्माला अतिशय महत्त्व आहे, त्याचप्रमाणे नामस्मरणालासुद्धा फार महत्त्व आहे.
२ आ २. श्रीकृष्णांनी भगवद़्गीतेत ‘मूर्तीपूजा एकाच देवाची करा’, असे सांगण्यामागील कारण : श्रीकृष्ण भगवद़्गीतेत सांगतात, ‘मूर्तीपूजा केली, तरी ती एकाच देवाची करा. एकाच देवाच्या स्वरूपाची करा.’ एकाच देवाच्या स्वरूपाची अनन्यभावे पूजा आणि सेवा केली, तर देव त्या भक्ताला त्याच स्वरूपात दर्शन देतो. समर्थ रामदासस्वामींना प्रत्यक्ष रामाने दर्शन दिले आणि हनुमानाच्या हृदयात तर रामाचा वासच होता.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
– श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ९, श्लोक २२
अर्थ : जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
२ आ ३. धर्म म्हणजे काय ? : श्रीकृष्णांनी भगवद़्गीतेत सांगितले आहे, ‘त्या वैश्विक शक्तीला पुजून आणि तिला अनन्यभावे शरण जाऊन ‘आम्हाला मनःशांती आणि आनंद यांची अनुभूती घेता येऊ दे’, अशी प्रार्थना करणे किंवा करुणा भाकणे’, यालाच धर्म म्हणतात.’
२ इ. अहंकारामुळे वेगवेगळ्या धर्मांचे लोक आपापसांत भांडत असणे : प्रत्येक धर्माच्या विचारांत ईश्वर हा वेगळा नसतो. सर्व धर्मांचे लोक तीच वैश्विक शक्ती (म्हणजेच युनिव्हर्सल पॉवर) मानत असतात. धर्माचे कारण देऊन वेगवेगळ्या धर्मांचे लोक आपापसांत का बरे भांडतात ? ‘माणसातील नको तेवढा पोसलेला अहंकार’, हे त्यामागील कारण आहे; म्हणून एका गाण्यात म्हटले आहे,
‘माझे, माझे’ म्हणूनी ओझे वहातो हा देह ।
स्वार्थभर्या या जगात नाही दुजा धर्म ।
कधीतरी येते देवा माझी मला कीव ।
कशासाठी धावाधाव, व्यर्थ उठाठेव ॥
आजवर धर्म, जात आणि पंथ यांच्या दुराभिमानाने समाज दुभंगला गेला, अनेकांच्या हत्या झाल्या, तसेच मने कलुषित झाली. दुसर्या धर्माचा उगाचच द्वेष करण्याची एक वाईट पद्धत समाजात रूढ झाली; म्हणून प.पू. कलावतीआई अद्वैताचा पुरस्कार करतात. त्या म्हणतात, ‘अनेकाकारात पहाण्याची जी वृत्ती, तो अधर्म आणि तोच प्रपंच. ‘अनेकाकारात एक तत्त्व पहाणे’, हा धर्म आणि हाच परमार्थ होय.’
२ ई. कलियुगात ‘भगवंताचे नाम’, हेच वैश्विक शक्तीचे दुसरे रूप असणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांनी म्हटले आहे,
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥ १ ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद़्गद जपे आधीं ॥ २ ॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥
– संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ, अभंग २६
अर्थ : एकतत्त्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले, तर हरीला त्या जिवाची करुणा येते. ते नाम घेणे सहजसोपे आहे; परंतु जिव्हेवर सतत ते घेतले पाहिजे. नामाविना दुसरे अन्य तत्त्व नाही. दुसरा पंथ हे दुसरे तत्त्व नाहीच. मी सतत मौनातही अंतरात श्रीहरीचे नाम जपत असतो’, असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात.
भगवान श्रीकृष्णांनीही गीतेत कलियुगातील नामस्मरणाचे महत्त्व वर्णन केले आहे. सर्व संत आणि सज्जन यांनीसुद्धा ‘नामस्मरण करत रहा, म्हणजे तुम्हाला देव पावेल’, असे सांगितले आहे. प्रत्येक धर्माचा माणूस नामस्मरण करत असतो; परंतु त्यांचे ‘नाम’ हे वेगवेगळे असते. ‘नाम हेच त्या वैश्विक शक्तीचे दुसरे रूप आहे’, असे विद्वान लोक मानतात.’
– पू. किरण फाटक, शास्त्रीय गायक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१९.८.२०२३)