केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा !

  • ‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण

  • समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर व मुख्यमंत्री केरळचे पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – दोन दिवसांपूर्वी राज्यात ‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात झालेल्या बाँबस्फोटांसाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राज्य सरकारला उत्तरदायी धरले आहे. त्यांनी फेसबुकवरून लिहिले की, काँग्रेस आणि माकप यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे आज निर्दोष लोकांचा जीव गेला आहे, ही गोष्ट सर्व लोक लक्षात ठेवतील. चंद्रशेखर यांनी या पोस्टमध्ये बाँबस्फोटांच्या घटनेला काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या एका कार्यक्रमात हमासच्या आतंकवाद्याने ऑनलाईन भाषण दिल्याचा संदर्भ जोडत म्हटले की, तुष्टीकरणाने परिसीमा गाठली आहे. चंद्रशेखर यांनी ३० ऑक्टोबरला घटनास्थळी भेटही दिली होती.

‘समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप करत आता केरळ पोलिसांनी चंद्रशेखर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनीही चंद्रशेखर यांच्या वक्तव्याला विरोध करत ते विष ओकत असल्याचे म्हटले आहे.