गोव्यात समुद्रकिनारपट्टीवरील ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा बसवली

पणजी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – नवीन पर्यटक हंगामाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात विविध समुद्रकिनार्‍यांवर ‘ऑनलाईन रिअल टाईम’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे. उत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, कांदोळी, कळंगुट, बागा आणि हणजूण, तसेच दक्षिण गोव्यात कोलवा, केळशी, बाणावली आणि आगोंद समुद्रकिनारा मिळून एकूण १२ ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.

गोवा समुद्रकिनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरणाने मोरजी आणि मांद्रे हे समुद्रकिनारे ‘सायलंट झोन’ म्हणून अधिसूचित केले आहेत आणि या ठिकाणी समुद्रकिनार्‍यांवर पार्टी करण्यास पूर्णपणे बंदी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून या सर्व १२ ठिकाणांच्या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवली जाणार आहे. ही यंत्रणा प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही जोडण्यात आलेली आहे. या ठिकाणी २४ घंटे आणि ३६५ दिवस ध्वनी नोंद केला जाणार आहे. ध्वनीप्रदूषण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. युरोपियन संघ आणि अमेरिकेची पर्यावरण संरक्षण संस्था यांच्या नियमांचे पालन करणारी यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आली आहे. नियमानुसार बाजाराच्या ठिकाणी दिवसा ६६ डिबी आणि रात्री ५५ डिबी, निवासी क्षेत्राच्या ठिकाणी दिवसा ५५ डिबी आणि रात्री ४५ डिबी ध्वनीमर्यादा आहे.

संपादकीय भूमिका

यंत्रणा कितीही अत्याधुनिक बसवली, तरी दोषींवर कारवाई करण्याची प्रशासनाची इच्छाशक्ती हवी !