व्याघ्र संरक्षित क्षेत्र : सरकारच्या विरोधात अवमान याचिका

पणजी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत २४ ऑक्टोबर या दिवशी संपली आहे. यामुळे ‘गोवा फाऊंडेशन’ या पर्यावरणप्रेमी संघटनेने गोवा सरकारच्या विरोधात गोवा खंडपिठात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. यावर १ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

गोवा सरकारने व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज २० ऑक्टोबर या दिवशी गोवा खंडपिठासमोर केला होता; मात्र सरकारला मुदतवाढ मिळालेली नाही, तसेच गोवा सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी; म्हणून सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर १० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. ‘गोवा फाऊंडेशन’ने प्रविष्ट केलेल्या अवमान याचिकेत राज्य सरकारसह गोवा राज्य वन्यजीव मंडळ, मुख्य वन्यजीव वॉर्डन, प्रधान वनपाल, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि पर्यावरण, वन अन् हवामान पालट मंत्रालय यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.