‘कोल्‍हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रिज’चे वर्ष २०२३ चे पुरस्‍कार घोषित !

कोल्‍हापूर, ३० ऑक्‍टोबर (वार्ता.) – ‘कोल्‍हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज’चे वर्ष २०२३ चे पुरस्‍कार घोषित झाले आहेत. हा पुरस्‍कार सोहळा २ नोव्‍हेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्‍हणून देहली येथील राष्‍ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्‍य ज्ञानेश्‍वर मुळे उपस्‍थित रहाणार आहेत, अशी माहिती चेंबरचे अध्‍यक्ष श्री. संजय शेटे यांनी पत्रकार परिषेदत दिली. या प्रसंगी उपाध्‍यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्‍गे, वैभव सावर्डेकर, माजी अध्‍यक्ष आनंद माने, संचालक प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्‍टे, संपत पाटील आदी उपस्‍थित होते.

श्री. संजय शेटे पुढे म्‍हणाले, ‘‘कोल्‍हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज ही कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील व्‍यापारी, उद्योजक, व्‍यावसायिक यांची प्रातिनिधीक शिखर संघटना असून गेल्‍या ४० वर्षांपासून व्‍यापारी-उद्योजक यांच्‍या प्रगतीसाठी, तसेच त्‍यांच्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी कार्य करत आहे. व्‍यापार क्षेत्रातील सभासदांनी केलेल्‍या कार्याचा गौरव करण्‍यासाठी, तसेच शून्‍यातून विश्‍व निर्माण करणार्‍या व्‍यापारी-उद्योजकांना गौरवण्‍याची परंपरा वर्ष २०१८ पासून आम्‍ही चालू केली. यंदाच्‍या वर्षी हे पुरस्‍कार ‘घाटगे पाटील इंडस्‍ट्रीज लि.’चे किरण जयकुमार पाटील, ‘ट्रायो एंटरप्रायजेस’चे पद्माकर विनायक सप्रे, ‘परदेशी आणि कंपनी’चे भालचंद्र शिवप्रसाद परदेशी, नव-व्‍यापार उद्योग पुरस्‍कार ‘मौर्या इंडस्‍ट्रीज’चे मंगेश केशवराव पाटील आणि ‘लँडक्राफ्‍ट अ‍ॅग्रो एल्.एल्.पी.’चे मयंक अलोक गुप्‍ता यांना देण्‍यात येणार आहेत.’’