४ नोव्हेंबरला रत्नागिरी नगर वाचनालयात पत्रकार उदय निरगुडकर यांचे व्याख्यान
रत्नागिरी – ४ नोव्हेंबरला रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात पत्रकार श्री. उदय निरगुडकर यांच्या ‘भारत @ २०४५’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार उदय निरगुडकर हे २०१७ पर्यंत ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. तसेच टाटा आणि गोदरेज यांसारख्या आस्थापनांमध्ये २० हून अधिक वर्षे आयटी तज्ञ म्हणून ते काम पहात आहेत. प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांच्या ‘भाषाकौशल्य’ आणि ‘स्वयंशिस्त’ या गुणांची छाप दिसून येते. लेखनक्षेत्रातही ‘लोकल ग्लोबल’, ‘सी.इ.ओ.’ ‘निवडणूक जिंकण्यासाठी’ या पुस्तकांनी वाचकांच्या मनात घर केले आहे.
काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात. श्री. निरगुडकर यांच्या लक्षात आलेले जागतिक संभाव्य पालट आणि त्यांचे परिणाम काय असू शकतात ? या पालटांमध्ये आपण नेमके कुठे आहोत ? आपल्या देशाचे भवितव्य काय असेल ? याचे अभ्यासपूर्ण विवेचन ते रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या माध्यमातून मांडणार आहेत.
हे व्याख्यान रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले असून सर्व जागृत रत्नागिरीकरांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी केले आहे.