सरदार पटेल यांचे जीवनचरित्र समजून घेणे आवश्यक ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
सरदार पटेल यांचा जीवनपटावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
रत्नागिरी – सरदार पटेल यांचे जीवनचरित्र सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. असे आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित करणार्या केंद्रीय संचार ब्युरोचे कौतुक करावे लागेल, असे गौरवोद्गार रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
हे प्रदर्शन ३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी, या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही या वेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले.
या प्रदर्शनात विविध कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच व्ही.आर् गॉगल्स, प्रश्नमंजुषा आणि ३६० डिग्री सेल्फी बुथ या वेळी प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे.