रस्ता चौपदरीकरणात संपादित झालेल्या देवस्थानच्या भूमीतील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार
चिपळूण – तालुक्यातील मौजे पेढे आणि परशुराम ही २ गावे देवस्थान इनामातील आहेत. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणामध्ये देवस्थानची ही भूमी संपादित झाली आहे. या भूमीच्या एकूण मोबदल्यापैकी ५० टक्के मोबदला कुळांना, १० टक्के देवस्थान समितीला आणि उर्वरित ४० टक्क्यांचा मोबदला प्रशासनाच्या नावे ठेव ठेवण्याविषयी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.
या बैठकीला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सदानंद चव्हाण, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि कुळ उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री सामंत यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घोषित केला. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
पालकमंत्री सामंत यांनी चिपळूण शहर विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी या वेळी सविस्तर आढावा दिला.
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले की, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नूतनीकरणाचे अडीच कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. क्रीडा संकुल ‘सिंथेटिक कोर्ट’ बनवणे, तसेच सिंथेटिक कोर्टावरती विद्युतीकरण करणे प्रगतीपथावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याच्या सभोवती, भिंतीवर दगडी आच्छादन करणे आणि उर्वरित सुशोभिकरणाचे काम याविषयी आदेश देण्यात आला असून १० नोव्हेंबरपासून कामास प्रारंभ होणार आहे.
१४ घरे तिवरे येथे आणि उर्वरित घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना
तालुक्यातील तिवरे (भेंदवाडी) येथील धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरासंदर्भातही बैठक झाली. या बैठकीत १४ घरे तिवरे येथे बांधायची, तर उरलेली १९ घरे आणि पेढे-परशुराम भूस्खलनातील ७ घरांचे पुनर्वसन, अशी एकूण २६ घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना पालकमंत्री सामंत यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केली. या बैठकीला तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.